मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाचा संसर्ग आणि त्यात नाताळ नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवासाठी नागरिक रस्त्यावर येतील या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी असली तरी घराबाहेर पडण्यास उभा आहे. परंतु, गर्दी करू नका, असा सल्ला मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच हा विषाणू नवीन रूप धारण करत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकत्र येतात, त्यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने राज्यात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, यामुळे नोकरदार, सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये संभ्रम आहे. सरकारने लावलेली संचारबंदी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी असल्याचे नांगरे-पाटील यांनी म्हटले आहे.
रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. रात्रपाळीचे कार्यालये वगळता हॉटेल, सिनेमागृह अशी करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना रात्री अकरा वाजता बंद करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक एकटेदुकटे घराबाहेर पडू शकतात. दुचाकी किंवा कारनेही प्रवासही करू शकतात. मात्र, यामध्ये चार पेक्षा अधिक व्यक्ती नको असे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा