शायनिंग मारणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
मुंबई, दि. २४ : दिवसा हॉटेलमध्ये वेटरचे काम आणि रात्री शायनिंग मारण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या आरोपीला क्राईम ब्रांच युनिट-८ ने नुकतीच अटक केली. संतोष कुमार असे त्याचे नाव असून त्याने ते पिस्तूल कुठून आणले याचा तपास युनिट-८ करत आहे.
अंधेरी परिसरात एकजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती युनिट-८ ला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक धुतुराज शिरसाट, यादव, सावंत, कांबळे, सुतार, सटाले यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी अंधेरीत परिसरात सापळा रचून संतोष कुमार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनवण्याची पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
संतोष हा मूळचा दक्षिण कर्नाटकचा रहिवाशी असून तो बोरवली येथे एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला गुन्हेगारी विश्वाबाबत खूप आकर्षण आहे. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो युट्युबवर गुन्हेगारी जगताबाबत व्हिडिओ पाहत असायचा. संतोष हा दिवसा हॉटेलमध्ये काम केल्यानंतर रात्री तो बाहेर पडायचा. शायनिंग मारण्यासाठी तो बाहेर पडत असताना स्वतः सोबत पिस्तूल घेऊन जायचा. शायनिंग मारताना पिस्तूल दिसल्यास त्याला खंडणीसाठी धमकावणे आणि पैसे वसुलीचे काम मिळेल असे वाटत होते. त्याने नुकतीच काही जणांशी मैत्री देखील केली होती. त्याच्यासोबत तो रात्रभर पिस्तूल घेऊन फिरत असे. पिस्तूल प्रकरणी संतोष कुमार विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास युनिट-८ करत आहे. संतोषला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा