दक्षिण, पूर्व सायबर कक्षाची उत्तम कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : युट्युबवर व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे सांगून टास्कच्या नावाखाली मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर आणि पूर्व सायबर कक्षाने गजाआड केले आहे. पोलिसांनी कारवाई करून १२ जणांना अटक केली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पार्ट टाइम जॉब आणि युट्युब वर व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे सांगून टास्कच्या नावाखाली मेसेज पाठवले जात आहेत. टास्कच्या नावाखाली या चोरांनी फसवणूक केल्याचे मुंबईत १७० गुन्हे दाखल झाले आहेत. दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचे ५१ गुन्हे सायबर कक्षाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहेत. सायबरचे पोलीस उपायुक्त डॉ. बाळसिंग राजपूत यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. तपासासाठी दहा पथके तयार केली आहेत. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका महिलेची टास्कच्या नावाखाली ठगाणे २५ लाख रुपयांची फसवणूक केली.
महिलेच्या तक्रारीवरून दक्षिण सायबर कक्षाने तपास सुरू केला असता तपासा दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली त्या माहितीवरून पोलिसांचे पथक लालबाग परिसरात गेले तेथून पोलिसांनी मिलिंद शेट्ये, गोरबहादुर सिंग, संतोष शेट्ये, लक्ष्मण सीमाला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत शगुप्ता या महिलेचे नाव समोर आले. पोलिसांनी शगुप्ताला ताब्यात घेतले. तिने तिच्या नावावर बनावट कंपन्या सुरू केल्या असल्याचे चौकशीत समोर आले. शगुप्ताच्या चौकशीत मुख्य सूत्रधार तुषार अजवानीचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली. तुषारचे एमबीएपर्यंतच्या शिक्षण झाले असून तो एजंटचे काम करतो. तसेच त्याच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात तुषारला १५ लाख रुपये मिळाले होते. त्याच्याकडून लॅपटॉप, ११ मोबाईल आणि विविध कंपन्यांची माहिती कागदपत्रे जप्त केली आहेत.
तर दुसरीकडे टास्कच्या नावाखाली एका व्यक्तीचे २७ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. फसवणुकी प्रकरणी पूर्व सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. फसवणुकीसाठी बनावट बँक खात्याचा वापर झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक मिरारोड येथे गेले. तेथून पोलिसांनी स्नेह महावीर प्रसाद, महावीर सिंह आणि देवकिशन गुर्जरला अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा