सोशल मीडियावर जुन्या मोबाइलची विक्री; मालाडच्या कॉल सेंटरवर कारवाई
मुंबई : सोशल मीडियावर मोबाईलची जाहिरात करून खराब आणि जुने मोबाईल पार्सलद्वारे पाठवून उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकाता येथील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा कांदिवली युनिट गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरचे मालक राहील जयंतीलाल रांका आणि टीम लीडर सिद्धेश संतोष सुतार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तेथे काम करणाऱ्या तीन तरुणीचा जबाब नोंदवून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे एक कोटी ३७ लाख ५२ हजार ५०१ रुपयांचे तीन हजार १९९ मोबाईल, डायलर संगणकाचा काळा रंगाचा डेल कंपनीचा सिपीयू, हार्ड डिक्स, एक ६४ जीबीचा पेनड्राइव, राहीलकडील दोन मोबाईल तसेच इतर दस्तऐवज जप्त केले आहेत. मालाड येथील काचपाडा, रामचंद्र एक्सटेंशन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील राहील रांका याने 'राहील इम्पेक्स' नावाने कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रेनो आणि ओप्पो कंपनीच्या मोबाईलची जाहिरात करण्यात आली होती. फक्त चार हजार रुपयांमध्ये मोबाईल मिळतील अशी जाहिरात करून अनेक ग्राहकांना मोबाईल खरेदी करण्यास प्रवृत्त केले जात होते.
स्वस्तात मोबाईल मिळत असल्याने अनेकांनी बुकिंग केले होते. मात्र, प्रत्यक्षात मोबाईलच्या पार्सलमध्ये बंद आणि जुने मायक्रोमॅक्स, वायको, व्हिडिओकॉन अशा कंपनीचे मोबाईल पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. काही तक्रारी प्राप्त होताच कांदिवली पोलिसांच्या युनिटने तपास सुरू केला होता. प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन गवस, मानसिंग पाटील, भरत घोणे, विशाल पाटील, पूनम यादव व अन्य पोलिस पथकाने संबंधित कॉल सेंटरमध्ये छापा टाकून कॉल सेंटरचे मालक राहील रांका आणि टीम लीडर सिद्धेश सुतार या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत गेल्या पाच वर्षांपासून राहीलचा हा जुन्या फोन विक्रीचा फसवणुकीचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. या कामासाठी त्याने तिथे २० हून अधिक तरुणींसह महिलांना कामावर ठेवले होते. त्यांना दीड हजारहून अधिक मोबाइल क्रमांकाची लिस्ट देण्यात येत होती. या सर्वांना त्या मुलीला कॉल करीत होत्या. कारवाईदरम्यान पोलिसांना तिथे तीन महिला कॉलवर बोलताना दिसून आल्या.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा