विवाह जुळवणाऱ्या मॅट्रिमोनिअल साईटवरून १४ महिलांना खोटे प्रोफाईल पाठवून स्वतः उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात पैसे घेऊन पोबारा करणाऱ्या मिस्टर नटवरलाल ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. आदित्य उर्फ तन्मय उर्फ प्रशांत म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या महाठगाचे नाव आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो आरोपी विवाहित असल्याचे समोर आले असून त्याला एक मुलगा देखील आहे. या महाठगाने आतापर्यंत १४ महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विवाह जुळवण्याच्या साइटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा साइटवरून अनोळखी व्यक्ती व ठग यांच्यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन ठाणे गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी यावेळी केले आहे.
मागील काही दिवसांमध्ये जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम अशा मॅट्रिमोनियल साइटवर महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांनी त्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव व त्यांच्या पथकाने अशा स्वरूपाच्या गुन्हे शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यादरम्यान कल्याण येथे एका महिलेने लग्न जमवणारी संस्था जीवनसाथी मॅट्रिमोनी साइटवर आपले प्रोफाईल बनवले होते. त्यातून तिला एका इसमाने आपण इस्रो मध्ये मोठ्या पदावर शास्त्रज्ञ असून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्याने या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून या ठगाने १४ लाख ३६ हजार रुपये वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात टाकण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर महिलेकडे या ठगाने पुन्हा २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या महिलेने खडकपाडा
पोलीस ठाणेमध्ये जाऊन रीतसर माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी अन्वये तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर आरोपी वाशी येथे एका मुलीला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास सापळा रचून पोलीस पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्या चौकशीत त्याने आत्तापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर दिंडोशी, खडकपाडा कल्याण, पार्कसाईट पोलीस ठाणे विक्रोळी, सांगवी पोलीस ठाणे पिंपरी पुणे, अलिबाग, रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई, एपीएमसी पोलीस स्टेशन नवी मुंबई आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
व्हिडिओ 👇 पहा...
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा