नायर दंत
महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामगिरीची देश पातळीवर दखल
वर्षभरात
तब्बल साडेतीन लाख रुग्णांवर उपचार करणारे दंत महाविद्यालय
देशातील सर्वात जुन्या दंत
महाविद्यालयांमध्ये दुस-या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणा-या आणि दरवर्षी
तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर परिणामकारक दंतोपचार करणा-या बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक
कामगिरीची दखल नुकतीच २ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. या
अंतर्गत ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने
देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये ३ रे स्थान देत आपल्या
महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या
नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत
महाविद्यालयाला ५ वे स्थान दिले आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त श्री.
इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश
काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या सर्व चमुचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या
आहेत.
एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील २
वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक
कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याचे नमूद करीत
नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी या बाबत
अधिक माहिती देताना सांगितले की, मार्च २०२० पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय
आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या परिस्थितीत
दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने आत्यंतिक काळजी घेणे
क्रमप्राप्त आहे. मात्र, हे
आव्हान नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी - कामगार – कर्मचारी
- अधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी समर्थपणे हाताळत आहेत. अधिकाधिक
नाविण्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणा-या सेवांचा नियमितपणे विस्तार करणा-या
नायर दंत महाविद्यालयात एकावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे
शिक्षण घेत असतात. यामध्ये ५ वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि ३ वर्षीय
पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या
विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७
प्राध्यापक (शिक्षक) या महाविद्यालयात कार्यरत आहेत.
या महाविद्यालयाची पदवी अभ्यासक्रमाची
प्रवेश क्षमता ७५ इतकी आहे. तर, पदव्युत्तर प्रवेश क्षमता ही २५ इतकी आहे. या दंत वैद्यकीय
महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
स्तरावर नामवंत दंत वैद्यक म्हणून सेवा देत आहेत. २४ तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित
करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय असल्याची माहिती डॉ. अंद्राडे
यांनी दिली आहे.
एकाचवेळी २ सर्वेक्षणांमध्ये गौरव
देशभरातील शासकीय आणि खासगी
क्षेत्रातील दंत महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन
करुन त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदाच्या वर्षी जी
२ वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली, त्यामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा
गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे २
नामांकित नियतकालिकांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी देशातील दंत
महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक
सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणा-या
विद्यार्थ्यांना मिळणा-या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे
मूल्यांकन करण्यात आले.
सर्वेक्षणात ५ वे स्थान
‘द
वीक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशपातळीवरील सार्वजनिक व खासगी
क्षेत्र मिळून विविध दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात
आले. या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला देशभरात ५ वा क्रमांक बहाल करण्यात
आला आहे. ‘द वीक’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात हे वृत्त प्रकाशित झाले
आहे.
सर्वेक्षणात ३ रे स्थान
‘आऊटलुक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा
निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे बहुस्तरीय मूल्यमापन करण्यात आले.
या सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने
शासकीय महाविद्यालय गटामध्ये ३ रे स्थान पटकाविले आहे. ‘आऊटलुक’च्या
नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात ही यादी प्रकाशित झाली आहे.
वरीलनुसार सन २०२१ मध्ये २ वेगवेगळ्या
संस्थांद्वारे देशभरातील दंत महाविद्यालयांचे शास्त्रीय पद्धतीने विविध निकषांवर
आधारित सर्वेक्षण करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील नायर दंत महाविद्यालयाच्या कामगिरीवर
वेगवेगळ्या २ सर्वेक्षणांमध्ये गौरवपूर्ण शिक्कामोर्तब करण्यात आल्याने नायर दंत
महाविद्यालयाद्वारे देण्यात येणा-या सेवा व त्यांची गुणवत्ता आणि सर्वंकष कामगिरी
पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
महाविद्यालयाविषयी थोडक्यात महत्त्वाचे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत
महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना सन १९३३ मध्ये झाली. येत्या १८ डिसेंबर रोजी
८८ व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुस-या
क्रमांकाचे दंत रुग्णालय व महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना
वैद्यकीय सेवा देणा-या या रुग्णालयात ९ ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग आहेत. दातांवरील उपचारांमध्ये
अद्ययावत आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह वैद्यकीय सेवा देणा-या या महाविद्यालयात
संबंधित उपचारांसाठी १८७ डेंन्टल चेअर असून, उपचारासाठी भरती होणा-या रुग्णांसाठी
२० खाटांचा अद्ययावत विभाग देखील आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र व समर्पित
शस्त्रक्रियागृह (Operation
Theatre) असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे.
(जसंवि /३०१)
0 टिप्पण्या