जेधेंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसतर्फे डॉ. सदानंद मोरे यांचे ऑनलाईन व्याख्यान.
मुंबई : केशवराव जेधे यांना शेतकरी, कामगार, बहुजन समाजाच्या कल्याणाची तळमळ होती. महाराष्ट्रात काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचे महत्वाचे योगदान लाभले आहे. जेधे यांच्या सारखा लढवय्या नेता महाराष्ट्राला व काँग्रेसला लाभला होता. त्यांचे विचारे व कर्तृत्व तरुण पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यकर्माच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि कार्य लोकांपर्यत पोहचवण्याचे काम काँग्रेस करेल. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते, स्वातंत्र्यसैनिक केशवराव जेधे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली 'केशवराव जेधे, बहुजन करारी नेतृत्व' या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण आणि केशवराव जेधे या दोघांचे महान नेतृत्व राज्याला लाभले. या दोघांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाची पायाभरणी खंबीरपणे झाली आहे. केशवराव जेधे यांना कष्टकरी, कामगार, शेतकरी, बहुजन समाजाच्या कल्याणाची तळमळ होती. केशवराव जेधे यांचे विचार नवीन पिढीला माहित व्हावेत ही काँग्रेसची भूमिका आहे. यासाठी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेल, फ्रंटलच्या माध्यमातून जेधेंचे विचार काँग्रेस राज्यभर पोहचवेल.
डॉ. सदानंद मोरे यावेळी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या उदयानंतर काँग्रेसमध्ये बदल होऊ लागला. त्यापूर्वी केशवराज जेधे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विदर्भातून सर्वात जास्त आमदार निवडून आले होते पण त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदारही मोठ्या संख्येने निवडणून आले होते. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जेधे यांना सांगितले की, बहुजनांचा विकासाचे ध्येय साध्य करायचे असेल तर प्रादेशिक पक्षात राहून पूर्ण होणार नाही त्यासाठी राष्ट्रीय पक्षात यावे, यशवंतराव चव्हाण यांच्या आवाहनानंतर केशवराव जेधे हे काँग्रेस या राष्ट्रीय पक्षात पुन्हा आले. जेधे यांना माननारा मोठा वर्ग महाराष्ट्रात होता, त्यांच्या घरात लोकांचा सतत राबता असायचा. जेधे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांच्याबरोबर बहुजन समाजही काँग्रेसमध्ये आला. जेधेंच्या काँग्रेसमध्ये येण्याने काँग्रेसचे बळ वाढले त्यानंतर ते प्रांताध्यक्षही झाले. महाराष्ट्रात काँग्रेसला तळागाळात पोहचवण्याचे काम जेधे यांनी केले. काँग्रेसचे अधिवशेन खेड्यात घेण्याचे कामही जेधे यांनी केले व काँग्रेसचा विचार गावात पाहोचवला. जेधेंमुळे महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत झाली. केशवराव जेधे यांनी जे केले ते प्रामाणिकपणे केले, ते अन्यायाविरोधात लढले. काँग्रेसला पुढे सत्ता मिळाली त्यात जेधे यांचे मोठे योगदान होते, असे मोरे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा