अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीची चोरीस गेलेली पर्स परत मिळवून दिली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १३ जुलै, २०२३

demo-image

अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीची चोरीस गेलेली पर्स परत मिळवून दिली

मुंबई, १३ : पार केलेल्या गाडीतून नजर चुकवून एक पर्स चोरण्यात आली होती. २ लाख ९० हजार किमतीच्या त्या पर्स आणि त्यात अत्यंत महत्त्वाची अशी कागदपत्र होती. ही बाब लक्षात येताच अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षे विद्यार्थिनीला मोठा धक्काच बसला. मात्र, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अचूक तपास करून काही तासात आरोपींना पकडले व सर्व मुद्देमाल तरुणीला परत केला.


तक्रारदार तरुणी ही २०१७ पासून अमेरिकेत शिक्षण घेत आहे. सध्या ती मुंबईत आली असून ९ तारखेला आई-वडिलांसोबत ती त्यांच्या कारने काही वस्तू खरेदी करण्यासाठी सीएसएमटी येथील लोहार चाळ येथे गेली होती. तिचे वडील गाडी चालवत होते. तक्रारदार मुलगी तिच्या आईसोबत खरेदी करण्यासाठी गेली. तर तिचे वडील कार मध्येच बसले होते. दरम्यान प्रियाने एक छत्री आणून वडिलांच्या शेजारील सीटवर ठेवली आणि ती परत निघून गेली. तिचे वडील ती छत्री उचलून डिक्कीत ठेवण्यासाठी कारच्या बाहेर पडले. डिक्कीचा दरवाजा उघडून छत्री ठेवली व परत चालकाच्या सीटवर येऊन बसले असता तक्रारदार मुलीची पर्स गायब झालेले त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्याच दिवशी व्हीसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला जायचं असतानाच कागदपत्रे चोरीस गेल्याने तक्रारदार मुलीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुशील कुमार वंजारी, उपनिरीक्षक प्रदीप भिताडे तसेच परुळेकर, राऊत, गुजर, खांडेकर, सातपुते, साळुंखे, साटम, शिंदे आदी टीमने तपास सुरू केला.


घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चार जणांनी मोठ्या चपळाईने १५ ते २० सेकंदांच्या कालावधीत कारमधील पर्स चोरून नेल्याचे निष्पन्न झाले तसेच चोरी करणारा राजेश सुम्मा सोळंकी हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. वंजारी यांनी तातडीने पुढील तपासकरिता पायधुनी परिसरात शोधमोहीम राबवून फुटपाथवर राहणाऱ्या राजेशला ताब्यात घेतले. मग त्याचे अन्य साथीदार संतराम चौहान, राजन दिनेशप्रसाद मोरे, सलमान शेख या तिघांनाही मोठया शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन किमती पर्स रोख रक्कम असा एकूण २ लाख ९० हजार किमतीचा ऐवज तसेच तक्रारदार मुलीचे महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करून तिला पुन्हा देण्यात आली.

Cr४१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *