आपल्या मुंबईला मिळाली एक नवी ओळख !
मुंबईच्या पर्यावरणापूरकतेवर संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेचे शिक्कामोर्तब
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे व वृक्ष प्राधिकरणाचे कौतुक
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देतानाच मुंबईतील पर्यावरणाची जोपासना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल आता थेट संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे. या संस्थेने 'वृक्ष नगरी' अर्थात 'Tree City' चा 'वर्ष २०२१' साठीचा बहुमान आपल्या मुंबईला घोषित केला आहे. हा असा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे 'स्वप्न नगरी' अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता 'वृक्ष नगरी' अशी एक नवी ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील 'अरबोर डे फाऊंडेशन' यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुक केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, सहआयुक्त श्री. अजित कुंभार, सहआयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत, उपायुक्त सर्वश्री संजोग कबरे व श्री. अजय राठोर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील 'अरबर डे फाऊंडेशन' चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे. तसेच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक 'नेटवर्क'मध्ये सहभागी झाले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्जा मिळवल्याबद्दल त्यांनी मुंबई शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई शहराच्या या बहुमानाने बद्दल अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक श्री जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारतातील केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे 'वृक्ष नगरी'चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे अशीही माहिती श्री परदेशी यांनी यानिमित्ताने दिली आहे.
जसंवि/ १५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा