मुंबई महानगरासाठी ‘दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना’ या उपक्रमाचा राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
वातावरण बदलांना सामोरे जात शाश्वत विकासाकडे जाणारी मुंबई घडविण्यासाठी होणार प्रयत्न
डब्ल्यूआरआय इंडिया, मुंबई विद्यापीठ, टाटा समाजविज्ञान संस्था यांच्यासमवेत भागीदारीतून उपक्रम
वातावरण बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मानवाच्या हाताशी किती वेळ आहे, याचे भाकीत कोणीही करु शकत नसले तरी लवकरात लवकर आणि मुख्य म्हणजे निसर्ग पद्धतीला अनुसरुन उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरासाठी कार्यान्वित होत असलेला ‘दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना’ हा उपक्रम मुंबईसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण त्यातून जगालाही मार्गदर्शक ठरु शकतील, अशा उपाययोजना देणारे स्टार्ट अप तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत ‘दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना’ या उपक्रमाचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज (दिनांक २५ फेब्रुवारी २०२२) सायंकाळी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वातावरण बदलांना सामोरे जाताना निसर्ग आधारित उपाययोजना करुन शाश्वत स्वरुपाच्या मुंबई महानगराची जडणघडण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाखाली, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करताना मुंबई विद्यापीठ आणि टाटा समाज विज्ञान संस्था यांचेदेखील सहकार्य लाभणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास प्रख्यात पर्यावरणवादी पद्मश्री श्रीमती तुलसी गौडा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजीत कुंभार, टाटा समाज विज्ञान संस्थेच्या संचालक व कुलगुरु श्रीमती शालिनी भारत, अधिष्ठाता श्रीमती अमिता भिडे, महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) श्री. सुनील गोडसे, शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु श्री. राजेश कुलकर्णी, रोटरी इनर व्हील क्लब ऑफ मुंबईच्या श्रीमती निधी चतुर्वेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. डब्ल्यूआरआय इंडिया संस्थेच्या संचालक (नागरी विकास) श्रीमती जया धिंडाव यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली. तर संस्थेच्या कार्यक्रम प्रमुख श्रीमती लुबायना रंगवाला, ग्रीन योद्धा उपक्रमाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. सिद्धेश डहुस्कर हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यावेळी संबोधित करताना म्हणाले की, मुंबईसह राज्यात सिंगलयूज प्लास्टिक बंदी, विद्युत वाहनांच्या वापरावर भर, माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरण रक्षण असे एक ना अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारताने कार्बन न्यूट्रिलिटी गाठण्यासाठी सन २०७० चे लक्ष्य ठेवले असले तरी त्या अगोदरच हे लक्ष्य गाठले जावे म्हणून महाराष्ट्र राज्य हे देशासाठी मार्गदर्शक ठरु शकेल, अशी कामे करत आहे. दि सिटी फिक्स लॅब मध्ये ज्ञान आणि नावीन्य यांचा मिलाफ होणे अपेक्षित आहे. वातावरण बदलाच्या समस्यांवर कृत्रिम तऱहेने नव्हे तर निसर्गाच्याच पद्धतीने उपायदेखील शोधले गेले पाहिजेत, हा मूळ उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, संस्था यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, निसर्ग आधारित उपाययोजनांना गती देताना प्रारंभी मुंबईतील ५ ठिकाणी पथदर्शी कामे हाती घेतली जातील. मुंबई वातावरण बदल कृती आराखडा देखील लवकरच खुला होणार असून त्यामध्ये महत्त्वाच्या सहा पैलुंवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मुंबईतील प्रतिमाणसी पाणीपुरवठा वाढावा, कचऱयाचे प्रमाण कमी करुन अधिकाधिक शास्त्रोक्त व्यवस्थापन व्हावे, सार्वजनिक वाहतूकीसह जास्तीत जास्त खासगी वाहतूकही विद्युत वाहने आधारित व्हावी अशा महत्त्वाकांक्षी बाबींचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यातील उद्दिष्टे देखील विहित कालमर्यादेच्या आधी गाठण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले की, हवामान बदल आणि त्यातून मानवजातीला पोहोचणारा धोका लक्षात घेता येणाऱया पिढ्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी जागरुकता व कृती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वच शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रमाचा समावेश केलाच पाहिजे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना केंद्र परिसरात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असून तेथे विविध पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यासारखे तरुण नेतृत्व आणि त्यांचे सहकारी वातावरण बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दूरदृष्टी राखून प्रयत्न करत असल्याचा गौरवपर उल्लेखही डॉ. पेडणेकर यांनी केला.
श्री. अजीत कुंभार, श्रीमती शालिनी भारत यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘ग्रीन योद्धा’ बोधचिन्हाचे व पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले.
*****
निसर्ग आधारित उपाययोजना (नेचर बेस्ट सोल्युशन्स ऍक्सीलेरेटर) उपक्रमाविषयी संक्षिप्त माहिती-
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना उपक्रमाची मुहूर्तमेढ.
वातावरण बदलांना सामोरे जात, वातावरण बदल सक्षम व शाश्वत विकासाच्या दिशेने जाणारे शहर घडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणार.
पाणी टंचाई, पूरस्थिती, तापमान वाढ, हवेतील प्रदूषण, हरित क्षेत्रामध्ये घट यासारख्या पर्यावरण विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना.
हवा, पाणी, हरित क्षेत्र यांच्या आधारेच म्हणजे निसर्ग आधारित पद्धतींचाच उपयोग करुन अभिनव उपाययोजना शोधून काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न.
असे प्रयत्न करण्यासाठी संबंधित घटकांना निमंत्रित करुन त्यांना शासनासमवेत सहभागी करुन घेत सहाय्य करणे.
अशा घटकांमधील विजेत्यांना त्यांच्या उपाययोजना पथदर्शी स्वरुपात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी, त्यामध्ये वाढ करण्यासाठी मदत करणे.
वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया आणि सिटीज फॉर फॉरेस्टस यांनी संयुक्त भागीदारीतून निसर्ग आधारित उपाययोजना (नेचर बेस्ट सोल्युशन्स ऍक्सीलेरेटर) हा उपक्रम देशभर सुरु केला आहे. त्यास कॅटरपीलर फाऊंडेशन, युनायटेड किंग्डम सरकारचा पर्यावरण, खाद्यान्न आणि ग्रामविकास, नॉर्वे सरकारचे आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि वने उपक्रम, मुंबई विद्यापीठ, टाटा समाजविज्ञान संस्था इत्यादींचे सहकार्य लाभले आहे.
(जसंवि/५९७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा