डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा राज्यपालांची समूह विद्यापीठाला सूचना - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २३ जून, २०२१

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा राज्यपालांची समूह विद्यापीठाला सूचना

समूह विद्यापीठाने दोन वर्षात २० च्या आत राष्ट्रीय नामांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवावे - डॉ. अनिल काकोडकर

मुंबई, दि. 22 : राज्याचे पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठांतर्गत मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित महाविद्यालयांचा समावेश आहे. गुणवत्तेसाठी ही महाविद्यालये अगोदरच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे समूह विद्यापीठ म्हणून काम करताना डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाने सर्वोत्तमतेचा ध्यास घेत 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून लौकिक प्राप्त करावा अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.  

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाचे सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक मंगळवारी (दि. २२) राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली त्यावेळी ते बोलत होते.    

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे सदस्य डॉ अनिल काकोडकर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ स्वाती वाव्हळ, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अधिष्ठाता डॉ जयराम खोब्रागडे, कुलपतींचे सदस्य अविनाश दलाल आदी बैठकीला उपस्थित होते.

सन २०१९ साली स्थापन झालेल्या समूह विद्यापीठाच्या अडचणी अनेक आहेत. मात्र शासन समूह विद्यापीठाला निश्चितच सकारात्मकतेने  मदत करेल अशी आशा व्यक्त करताना विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच विभागाच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांवर मार्ग काढावा, अशी सूचना राज्यपालांनी समूह विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंना केली.

बैठकीला संबोधित करताना डॉ. अनिल काकोडकर यांनी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाने सरधोपट वाटेने न जाता उत्कृष्टतेसाठी नवा मार्ग शोधावा अशी सूचना केली.  डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठातील महाविद्यालयात दिले जाणारे स्नातक, स्नातकोत्तर, शिक्षक प्रशिक्षण व संशोधन हे अभ्यासक्रम एकमेकांना पूरक असून विद्यापीठाने समाज, उद्योग जगत व उच्च शिक्षण यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण कराव्या असे त्यांनी सांगितले.

समूह विद्यापीठाने ठरवून येत्या २ वर्षातच देशातील पहिल्या २० उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवावे अशी सूचना काकोडकर यांनी यावेळी केली.

समूह विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव अपर्णा सराफ यांनी यावेळी एक सादरीकरण केले. विद्यापीठातर्फे सुरु केले जाणारे नवे स्नातकोत्तर अभ्यासक्रम, विविध विद्यापीठांशी प्रस्तावित सहकार्य करार, विद्यापीठातील रिक्त जागा, भरावयाच्या जागा, विद्यापीठाच्या निधीच्या समस्या यांबाबत सादरीकरणातून माहिती दिली. 

बैठकीला वाणिज्य शाखेच्या अधिष्ठाता डॉ माधुरी कागलकर, डॉ नंदा पांढरीकर, राज्य शासनाचे प्रतिनिधी युवराज मालघे, डॉ रतन हजारे, उद्योग प्रतिनिधी डॉ राजीव लाथिया, वैज्ञानिक डॉ. सुनीत राणे, प्रभारी कुलसचिव अपर्णाला सराफ आदी उपस्थित होते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज