बोरिवली परिसरातील कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राचे उल्लेखनीय कार्य
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी दिल्या शुभेच्छा;
तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केले कौतुक !
.jpeg)
बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात तब्बल ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील ५ वर्षात अशा अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलासेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. थॅलेसिमियाग्रस्त रूग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार करू लागते, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे. त्याचबरोबर रक्ताचा कर्करोग म्हणजे लुकेमीया आणि अनेक इतर कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात. यानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक बालकांवर विविध स्तरीय उपचार करण्यात आले आहेत, असेही डॉ. मंगलानी यांनी सांगितले आहे.
.jpeg)
बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी या केंद्राला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या केंद्राला नुकतीच भेट देऊन तेथील डॉक्टरांशी व सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात मुंबईकर नागरिकांना अतिशय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेचे "कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र" अर्थात "सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र" हे अविरतपणे कार्यरत आहे. नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात जून २०१८ पासून २६ जुलै २०२३ पर्यंत तब्बल ३०० बोनमॅरो प्रत्योरोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट / बीएमटी) कार्यवाही पूर्ण करण्याचे कौतुकास्पद कार्य उपचार केंद्राच्या डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे. बीएमटी फिजिशियन, बालरोग रक्तदोष कर्करोग तज्ज्ञांसह एक पथक या सेवेसाठी समर्पित आहे. या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण केले जातात. यामध्ये 'अॅलोजेनिक' आणि 'ऑटोलॉगस' प्रत्यारोपण या दोन्हीं प्रक्रियांचा समावेश आहे. या केंद्रात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे १६८ एवढे मनुष्यबळ कार्यरत आहेत, अशी माहितीही केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
बोनमॅरो प्रत्यारोपण म्हणजे काय?
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दूषित असल्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात अनुरुप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करु लागते. ज्यामुळे बोनमॅरोच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही व रुग्ण थॅलेसेमियामुक्त होतो.
थॅलासेमियामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण हे सामान्यपणे ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केले गेल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा बोनमॅरो अनुरुप ठरण्याची शक्यता अधिक असते. या प्रत्यारोपणामुळे रुग्ण थॅलेसेमियामुक्त होण्याची शक्यता साधारणपणे ८० ते ९० टक्के असते. तसेच इतर रक्तदोष आणि कर्करोगग्रस्त मुलांमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण करुन त्यांना रोगापासून मुक्त करु शकतो.
मागील पाच वर्षात महानगरपालिकेच्या या केंदात केलेल्या ३०० 'बीएमटी'मध्ये १०८ दाते हे पूर्ण अनुरूप म्हणजे रूग्णाचे भावंडे किंवा पालक आहेत. या व्यतिरिक्त ७० प्रकरणांमध्ये संबंधित दाते हे अर्धे अनुरूप म्हणजे पालक किंवा भावंडे आहेत. तसेच १२ प्रत्यारोपणामध्ये, स्टेम सेल दात्याच्या नोंदणीद्वारे जुळलेल्या असंबंधित दात्यांकडून स्टेम सेल प्राप्त करण्यात आले. तर ११० रुग्णांमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण ॲटोलॉगस म्हणजे रुग्णाच्या स्व:ताच्या स्टेमसेल वापरुन करण्यात आलेले आहेत.
सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण निशुल्क
बोनमॅरो अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रूपयांची आवश्यकता असते. परंतु, महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे.
वैशिष्ट्यपूर्ण ८ खोल्या असलेले प्रत्यारोपण केंद्र
बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी प्रत्येक रूग्णाला स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण खोलीची आवश्यकता असते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या या खोलीत रूग्णास कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची आत्यंतीक काळजी घेतलेली असते. बोरिवलीतील या केंद्रात देखील या प्रकारच्या स्वतंत्र व समर्पित ८ खोल्या असून अशा खोल्या एकाच ठिकाणी असलेला हा महाराष्ट्रातील या प्रकारचा सर्वात मोठा 'बोन मॅरो प्रत्यारोपण विभाग' आहे.
या व्यतिरिक्त उपचार केंद्रामध्ये थॅलेसेमिया, बालरोग रक्तदोष, कर्करोगग्रस्त २२ रुग्णांना दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे. तर ६ खाटा या किमोथेरपी उपचारांसाठी राखीव असून १६ खाटा या वारंवार देण्यात येणाऱ्या रक्त संक्रमणासाठी वापरल्या जातात.
सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात अत्याधुनिक उपचारांसह अनेक सोयीसुविधा देण्यात येत आहेत. त्यांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : -
• बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी सर्वसाधारणपणे ३० दिवस ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत बालकासोबत आई, वडील किंवा सर्वात जवळचा नातेवाईक रुग्णालयामध्ये राहू शकतो. या रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीला देखील राहण्यासह भोजनाची सुविधा दिली जाते.
• बालरूग्णाची मनोरंजनाची गरज व त्यांचे भावविश्व लक्षात घेऊन प्रत्येक खोलीत स्वतंत्र दूरचित्रवाणी संचाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. एवढेच नाही तर कार्टून चॅनेल्स देखील या केंद्रातील प्रत्येक खोलीत उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर रूग्णाला खोलीच्या बाहेरचे दृष्य पाहता यावे यासाठी खोलीला बंद काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत.
• बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी दाखल झालेल्या बालकाला त्याची घरची खेळणी आणण्याची परवानगी असते. ही खेळणी निर्जंतुकीकरण करून बालकांना दिली जातात.
• उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या कालावधीत बालरुग्णाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि बालकांना मनोरंजनातून शिक्षण मिळावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
• मुलांची आणि पालकांची गरज लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन व सल्लामसलत करण्यासाठी समुपदेशक देखील या केंद्रात कार्यरत आहेत.
• रूग्ण आणि त्याच्यासोबत राहिलेल्या नातेवाईकांना आहारतज्ज्ञांच्या सूचनेनुसार तसेच निर्जंतुकीकरण केलेला आहार देण्यात येतो.
• रूग्ण दाखल झाल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपणाआधी एक महिना आणि उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन वर्षांपर्यंत किंवा गरजेनुसार फॉलोअप घेतला जातो.
• पेरिफेरल रक्त स्टेम सेल वेगळे करण्यासाठी याठिकाणी 'ऍफेरेसिस' या अत्याधुनिक संयंत्राची सुविधा उपलब्ध आहे.
• बोनमॅरो प्रत्यारोपणाच्या रुग्णांना रक्तसंक्रमण करण्यापूर्वीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी रक्त घटकांवर गॅमा इरॅडिएशन करण्यासाठी 'ब्लड इरॅडिएटर' मशीनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे.
• या केंद्रात ३ पोस्ट ग्रॅज्युएट सुपर स्पेशलाइजेशन फेलोशिप कोर्सेसची सुविधा देखील उपलब्ध आहे. यामधे प्रत्येक फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ४ असे ३ कोर्ससाठी एकूण १२ विद्यार्थी असतात. हे अभ्यासक्रम 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ' आणि 'इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक' यांच्याशी संलग्न आहे.
• या विविध अभ्यासक्रमांच्या निमित्ताने सुपर स्पेशलायझेशनसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे तज्ज्ञ डॉक्टर असतात. विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेल्या या डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे बाल रूग्णांना अधिक चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यास देखील मदत होते.
• या केंद्राला 'सी.एस.आर.' सह दानशूर व्यक्तींकडून आर्थिक स्वरूपात किंवा वस्तु स्वरूपात देणग्या प्राप्त होत असतात. या केंद्राला देण्यात येणाऱ्या आर्थिक देणग्या या आयकर विभागाच्या '८० जी' या नियमानुसार योग्य त्या आयकर विषयक लाभांसाठी पात्र आहेत.
जसंवि/२५०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा