मुलुंड पोलिसांकडून २४ तासांत गुन्ह्याची उकल
मुंबई, दि.११ : शेअर मार्केट मधील नुकसान आणि त्यातून झालेले कर्ज यामुळे झटपट पैसा मिळवण्यासाठी एका तरुणाने आयडिया केली. मालकाचे लाखो रुपये लुटण्यासाठी त्याने मित्राच्या मदतीने कट रचला आणि आपल्याला अज्ञातांनी लुटण्याचा बहाणा करीत १३ लाख ७५ हजारांची रोकड लांबवली. एवढे सर्व करण्यात व यशस्वी झाला. पण, म्हणून पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करीत अवघ्या २४ तासांत तरुणांच्या लुटमारीचा भांडाफोड केला.
मुलुंड येथील पाच रस्ता मॅरेथॉन चेंबर इमारतीत सिद्धार्थ शहा यांचे सिद्धार्थ अँड असोसिएट्स नावाची सी.ए. फर्म आहे. शहा यांच्याकडे काम करणारा सुमित वाडेकर हा तरुण ३ सप्टेंबर रोजी घाटकोपर येथून कंपनीच्या व्यवसायातील १४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन कार्यालयाच्या दिशेने येत होता. कार्यालयात प्रवेश करत असताना अज्ञात इसमाने सुमितला बेशुद्ध करून त्याच्याकडील पैशांची बॅग चोरण्यात आली होती. हा प्रकार समजल्यानंतर सिद्धार्थ शहा यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात त्याप्रमाणे तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष कांबळे, उपनिरीक्षक पूजा धाकतोडे तसेच ढोमणे, वाघमारे, कट्टे, कदम, पवार, बनसोडे, हाडवळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ तसेच घाटकोपर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु बेशुद्ध पडलेल्या सुमित याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी कौशल्याने तपास चक्र फिरवल्यावर सुमित वाडेकर यानेच त्याचा मित्र चेतन धाबे (वय, २४) याच्या मदतीने लुटमारिचा बनाव रचून पैसे लांबविल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सुमित आणि डोंबिवलीतील राहणारा त्याचा मित्र चेतन या दोघांनाही अटक करण्यात आली.
शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने सुमितला कर्ज झाले होते. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यातूनच मालकाचेच पैसे लुटण्याची आयडिया त्याला सुचली आणि चेतनला सोबत घेऊन गेल्या पंधरा-वीस दिवसांत त्यांनी पद्धतशीर प्लान रचून गुन्हा केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा