पोलिसांकडून साखळी उध्वस्त
मुंबई : चार महिन्यांच्या मुलीचे गिरगावातून अपहरण करून तिची तामिळनाडूमध्ये विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीन महिलांसह ११ आरोपींना अटक केली असून यामध्ये मुलीच्या वडिलांचाही समावेश आहे. तामिळनाडू येथील एका दाम्पत्याने या मुलीला ४ लाख ८० हजार रुपयांना खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
गिरगाव परिसरात इब्राहिम शेख हा तरुण एका महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये भाडेतत्त्वावरील घरात राहत होता. महिलेला चार महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली आणि अन्वरी शेख हिला या मुलीच्या देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. मुलीची आई महिना भरापूर्वी अचानक गायब झाली. २७ डिसेंबर रोजी इब्राहिम मुलीला दवाखान्यात लस देण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला, तो तिला घेऊन पुन्हा आलाच नाही. देखभालीसाठी असलेल्या अन्वरी हिने व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी आणि व्ही. पी. रोड पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक पाटील, अमित भोसले, अविनाश शिंदे, दिलीप तांबे यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
डोस द्यायचे निमित्त करून मुलीला घेऊन गेलेल्या इब्राहिमला शोधून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या इब्राहिमने मुलीला सांभाळण्यासाठी मित्र शेरू खान यांच्याकडे दिल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर शीव, धारावी, जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण, ठाणे अशा ठिकाणी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक केली.
या सहा जणांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तामिळनाडू येथील अनंतकुमार नागराजन या सिव्हिल इंजिनियरला मुलीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार तांबे व त्यांच्या पथकाने तामिळनाडूतील सेल्वनपट्टी गाठून नागराजन याच्याकडून चिमुकलीला ताब्यात घेतले. मूल होत नव्हते म्हणून नागराजनने ४ लाख ८० हजारांत मुलीला विकत घेतले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा