रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
मुंबई, दादासाहेब येंधे : रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.
कफ परेड येथील पुजारी (वय ६०) यांचे पान, बिडी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या पत्नीचा खानावळीचा व्यवसाय आहे. तेथेच रंजनकुमार मोहळीक राहायला होता. तो सीएसएमटी येथे शिपाई पदावर नोकरी करत असे. त्यांनी २०१२ मध्ये पुजारी यांना त्याच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. नोकरीच्या कामासाठी त्यांनी ५ लाख ५० रोख रकमेची मागणी केली. पुजारी यांनी एवढी रक्कम एकाचवेळी देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्याने ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्या असे सांगितले. यानंतर पुजारी यांनी त्यास विविध वेळी पैसे दिले. मात्र, २०१५ पर्यंत वाट बघूनही रेल्वेकडून मुलाला नोकरीचे कोणतेही नियुक्त पत्र आले नाही.
पुजारी यांनी मोहळीक याला विचारणा केली असता त्याने मुलगा पदवीधर असल्याने त्याला अधिकारी म्हणून नोकरी मिळेल अशी बतावणी करून आणखी ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मुलाला नोकरीची आवश्यकता असल्याने पुजारी यांनी त्याला जास्तीचे पैसे देण्यास होकार दिला. पुढे मार्च २०१५ पर्यंत पुजारी यांनी त्याला ही रक्कम पोच केली. मात्र, २०१७ वर्ष उजाडले तरी मुलाला नोकरी मिळाली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा