क्षय रोगातून पूर्णपणे मुक्त झालेल्या २३ नागरिकांची क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत ‘सक्षम टिबी साथी’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हे सक्षम साथी क्षयरोगाचा सामना करीत असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करण्यासह त्यांना औषधोपचार पुरविणे व जनजागृती करणे यासाठी हातभार लावणार आहेत. प्रतिमहिना १० हजार रुपये मानधन तत्त्वावर या सक्षम साथींचे कार्य सुरु झाले असून त्यामुळे त्यांना रोजगाराचा देखील मार्ग खुला झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था आणि टाटा समाज विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम जन ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर क्षयरोग मुक्त झालेल्या नागरिकांची निवड करण्यात आली. क्षय रोगावरील औषधोपचार पूर्ण घेऊन बरे झालेल्या नागरिकांनी स्वतःचे अनुभव इतर क्षय रुग्णांसोबत वाटून घ्यावेत, त्यातून इतर क्षय रुग्णांना समुपदेशन करताना औषधोपचार योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे, हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. थोडक्यात सम-अनुभवी सल्लागारांना ‘सक्षम साथी’ म्हणून निवडण्यात आले होते. संवाद कौशल्य, क्षयरोग विषयी आवश्यक ते ज्ञान इत्यादी निकष पूर्ण करणाऱया व्यक्तिंची निवड करुन त्यांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर त्यांना ९ जिल्हा केंद्रांवर नियुक्त करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविताना क्षयरोग मुक्त झालेल्या व्यक्तिंनी अर्थपूर्ण पद्धतीने, प्रतिबद्धरित्या इतर क्षय रुग्णांना शिक्षीत करावे, संबंधीत रुग्णांना क्षयरोग औषधोपचार पूर्ण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, हा मूळ उद्देश होता. परिणामी, क्षयरोग मुक्त झालेल्या व्यक्तिंच्या माध्यमातून सकारात्मक चित्र निर्माण होण्यास मदत झाली.
मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत सुमारे १०७ औषध संवेदनशील (काही क्षय औषधांना दाद न देणारे रुग्ण) तर १३५ औषध प्रतिरोधी (अनेक क्षय औषधांना दाद न देणारे रुग्ण) क्षयरुग्णांचे सक्षम साथींनी समुपदेशन केले. त्यामुळे सदर रुग्णांनी नियमित औषधोपचार घ्यायला सुरुवात केली. निक्षय पोषण योजना अंतर्गत सुमारे १० हजार ७८२ क्षय रुग्णांना त्यांच्या बँक खात्यात प्रति महिना ५०० रुपये थेट लाभ हस्तांतरण मिळावे म्हणून देखील या सक्षम साथींनी समन्वय साधला.
कोविड संसर्ग कालावधीत, क्षय रुग्णांनी आवश्यक त्या-त्या वेळी कोविड चाचणी करुन घ्यावी म्हणून अतिरिक्त ४ सक्षम साथी नेमण्यात आले होते. या अंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत ६७२ रुग्णांशी संपर्क साधण्यात आला. तर १२ नोव्हेंबर २०२० पासून आतापर्यंत सुमारे ९१७ कोविड बाधित रुग्णांना क्षय रोगाचे नियमित उपचार देखील सुरु ठेवावेत म्हणून समुपदेशन करण्यात आले.
क्षय रोगातून बरे झाल्यानंतरही ठराविक कालावधीने वैद्यकीय तपासणी करुन घेणे गरजेचे असते. या अनुषंगाने डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत सुमारे ७ हजार १८९ व्यक्तिंपर्यंत पोहोचून त्यातील १९ व्यक्तिंना पुनश्च तपासणी करुन घेण्यासाठी पाठविण्यात आले. तर ७५१ व्यक्तिंच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील पुढील चाचण्या करुन घेण्यासाठी संदर्भित करण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या सक्षम साथी प्रकल्पाचे हे यश पाहता केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाने देखील राष्ट्रीय पातळीवर या उपक्रमाचा गौरव केला. ही कामगिरी लक्षात घेता सक्षम साथी प्रकल्प आता महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये राबविला जात आहे. त्यासाठी दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०२१ असे २ दिवस प्रशिक्षण कार्यशाळा व निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली. त्यात सहभागी ३३ पैकी २४ पात्र व्यक्तिंची निवड करण्यात आली. पैकी २३ व्यक्तिंना टाटा समाज विज्ञान संस्थेद्वारे दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२१ असे २ दिवस आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेद्वारे त्यांना सक्षम टिबी साथी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पासून या सक्षम साथींनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना प्रतिमहिना १० हजार मानधन देखील दिले जाणार आहे.
(जसंवि/४३०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा