मुंबई, (दादासाहेब येंधे) : आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स ठेवल्याचा मेसेज आला होता.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर बाप्पा आपल्या भक्तांना पावला असे म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याला आता पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जात आहे.
नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (वय, ५०) आहे. तो मुळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे. धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आमि सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे.
आरोपीला नोएडातील सेक्टर ११३ मधून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पाठविलेल्या मेसेज मध्ये म्हटले होते की, तब्बल ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल. या संदेशामध्ये "लश्कर-ए-जिहादी" या संघटनेचे नावही घेतले गेले असून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत.

0 टिप्पण्या