‘सुप्त क्षयरोग’ प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मनपा राबविणार विशेष प्रकल्प
क्षयरोग रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंची करणार मोहीम
स्वरुपात तपासणी
सुप्त
क्षयरोगाचे मापन करण्यासाठी पहिल्यांदाच राबविला जाणार विशेष प्रकल्प
लोकसंख्येची घनता
लक्षात घेता मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे व दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळेच
मुंबईसारख्या शहरात क्षयरोग (Tuberculosis / TB) प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी
सर्वस्तरीय प्रयत्न करणे आणि विविध स्तरीय उपाययोजना व्यापकपणे व प्रभावीपणे
राबविणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक
आरोग्य खात्याने सुप्त क्षयरोग संसर्गास (Latent TB Infection / LTBI) प्रतिबंध
करण्यासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रातील
क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची मोहीम स्वरुपात चाचणी करण्यात
येणार आहे. यामुळे क्षयरोग प्रसारास प्रतिबंध होण्यासह ‘सन – २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त
भारत’ करण्याच्या
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे जाण्यासही मोलाची मदत होणार आहे. या
अनुषंगाने सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणा-या प्रकल्पाची नुकतीच
सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या
प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे.
बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या ‘एफ
दक्षिण’ विभाग कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकत्याच आयोजित करण्यात
आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला
गोमारे यांच्या उपस्थितीत सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणा-या सदर
प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मुंबईच्या शहर क्षयरोग अधिकारी
तथा संबंधीत प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक डॉ. (श्रीमती) प्रणिता टिपरे, ‘शेअर इंडिया’
या संस्थेचे प्रमुख
डॉ. विजय येळदंडी, प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सतीश कैपिल्यवार, ‘सीडीसी इंडिया’
या संस्थेच्या डॉ.
मेलिसा न्येंदक, श्री. ब्रायन कोलोडझिएस्की, श्री. लोकेश उपाध्याय, डॉ. राजेश
देशमुख व डॉ. क्रिस्टीन हो हे मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
त्याचबरोबर शेअर इंडिया या संस्थेच्या चमुतील डॉ. संपदा भिडे, डॉ. निकुंज फोफानी,
फातिमा खान यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील संबंधीत अधिकारी व कर्मचारी
देखील या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’
पद्धतीने उपस्थित
होते.
या कार्यक्रमात
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला
गोमारे यांनी नमूद केले की, सुप्त क्षयरोग संसर्ग मापन प्रकल्पामुळे बृहन्मुंबई
महानगरपालिका क्षेत्रातील क्षयरोग विरोधातील लढ्यास बळ मिळेल आणि क्षयरोग मुक्त मुंबईच्या दिशेने हे एक
महत्त्वाचे पाऊल आहे.
तसेच हा उपक्रम क्षयरोग
संसर्गास आळा घालण्यासह क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका
बजावेल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
तर शेअर इंडिया या
संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी यांनी या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांशी संवाद
साधताना सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात क्षयरोग विषयक
‘आयजीआरए’
ही वैद्यकीय चाचणी
करण्यासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा स्थापन करणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे;
इत्यादी बाबींसाठी
त्यांची संस्था
महानगरपालिकेला सहकार्य करेल. त्याचबरोबर
डॉ. येळदंडी यांनी या कार्यक्रमा दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे
आणि महानगरपालिकेद्वारे देण्यात येणा-या सेवा-सुविधांचे विशेष कौतुक केले.
‘सीडीसी
इंडिया’ या
संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक यांनी उद्बोधन करताना सांगितले की, या
प्रकल्पांतर्गत क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व घरातील व्यक्तिंची
सुप्त क्षयरोग संसर्गासाठी तपासणी केली जाणार आहे.
या तपासणी दरम्यान सुप्त क्षयरोगाची बाधा
आढळून आल्यास राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार व निर्धारित वैद्यकीय उपचार
क्रमानुसार बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासह आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल. तसेच
सक्रीय क्षयरोग असणा-या रुग्णांवर देखील निर्धारित औषधोपचार केले जातील.
दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाच्या अखेरीस, प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक डॉ. प्रणिता टिपरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच शेअर इंडिया आणि सीडीसी या संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्याप्रती देखील आभार व्यक्त केले.
१. सुप्त क्षयरोग (Latent TB Infection / LTBI) – सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. तसेच अशी बाधा झालेल्या व्यक्तिंमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. तथापि, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तिमध्ये भविष्यात ‘सक्रीय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर वेळच्यावेळी योग्य ते उपचार केल्यास संबंधीत व्यक्तिस भविष्यात सक्रीय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळेच सुप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा हा प्रकल्प मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
२.
आयजीआरए
चाचणी (Interferon Gamma Release Assay / IGRA) – सामान्यपणे क्षयरोग विषयक वैद्यकीय
चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आयजीआरए चाचणी करावी लागते.
या अंतर्गत संबंधीत व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी
केल्यापासून २४ तासांमध्ये मिळतो.
(जसंवि / ३१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा