Ticker

6/recent/ticker-posts

तीन कोटींच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात तीन वेगवेगळ्या कारवाईत तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन कोटींचा १.७३२ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. 

बोरिवलीतील नॅशनल पार्क परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १ किलो २९७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत २ कोटी ५९ लाख ४० हजार रुपये इतकी होती. हा साठा जप्त केल्यांनतर त्याच्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती.


दुसऱ्या कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांनी १३ सप्टेंबरला मालाडच्या साईनाथ रोड, म्युनिसिपल मार्केटजवळ अन्य एका तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना १८६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत ३६ लाख ८० हजार रुपये इतकी किंमत आहे. ही कारवाई ताजी असताना तिसर्‍या कारवाई वरळी युनिटने केली आहे.

सायन येथील बीएसटी बसस्टॉप, राणी लक्ष्मी चौकाजवळ वरळी युनिटने अशाच एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या अधिकाऱ्यांना २५१ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची किंमत ६२ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.

गेल्या दहा दिवसांत तीन वेगवेगळ्या कारवाई दरम्यान वरळी, कांदिवली आणि आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ कोटी ५८ लाख रुपयांचा १ किलो ७३२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या गुन्ह्यांत अटक केलेल्या तिघांनाही किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एका आरोपीला न्यायालयीन, तर दोन जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या