मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबईच्या पवई परिसरात चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत राम मोबाईल सर्व्हिस सेंटरचे मालक रामप्रसाद सरगुन राजभर (३७) आणि मोबाइल दुरुस्त करणारा गुलाम रसूल रशीद खान (२५) यांना रंगेहात पकडण्यात आले असून, दोघांनाही २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१९ सप्टेंबर रोजी स.पो.नि. धुतराज यांना गुप्त माहिती मिळाली की, तुंगागाव, साकीविहार रोडवरील राम मोबाईल सर्व्हिस सेंटर येथे चोरीचे मोबाईल घेऊन त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री केली जाते.
कक्ष-६ पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. ग्राहकाने मोबाईलचा आयएमईआय बदलण्याची मागणी केल्यावर, दुकानातील कामगाराने क्षणार्धात “अनलॉक टूल” वापरून आयएमईआय बदलला आणि मोबाईल ताबडतोब परत केला. याच क्षणी गुन्हे शाखेने छापा टाकत दोघांना जेरबंद केले. पोलीसांनी केलेल्या चौकशीत कामगाराने सांगितले की, तो गुगल क्रोमवरील “अनलॉक टूल” चा वापर करून मोबाईलचे आयएमईआय बदलत होता. या तंत्राचा वापर करून चोरीच्या मोबाईलचे मूळ ओळख क्रमांक गायब करून त्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा खुलासा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपींकडून आयएमआईआय क्रमांक बदललेले मोबाइल आणि इतर साहित्य असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरलेल्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून देत असल्याची कबुली या आरोपींनी दिली. एका मोबाइल फोनचा आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी ते तीन हजार रुपये घेत होते. या आरोपींच्या अटकेमुळे मोबाइल चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९९१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गुन्हे शाखा कक्ष-६ पुढील तपास करत आहेत.
सदर उत्कृष्ट तपास हा पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-६ चे प्रभारी पो.नि. भरत घोणे, स.पो.नि. धुतराज, पो.नि. सावंत आणि त्यांच्या पथकाने राबवली.

0 टिप्पण्या