Ticker

ऑनलाईन जुगारात हरल्यामुळे चोरी करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : ऑनलाईन जुगारात सात लाख रुपये हरल्यामुळे सोनसाखळी चोरी करण्यास सुरूवात केलेल्या दोन तरूणांना माटुंगा पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपीनी मित्रांकडून पैसे उधार घेऊन जुगार खेळला होता. त्यामुळे रक्कम परत देण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस  चौकशीत उघड झाले आहे. 

माटुंगा पोलिसांच्या आवारात १९ जुलै रोजी जैन मंदिरात दर्शन घेऊन तक्रारदार विजया हरिया (७४) घरी जात होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यानंतर ते मोटरसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी चोरांचा शोध घेण्याकरिता पथक बनवले होते.


गुन्हा दाखल झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास करून मोहिम अशोक संगिशेट्टी (२२) व रोहित ओमसिंह गौंड (१९) या दोघांना अटक केली. दोघेही कुर्ला पश्चिम येतील रहिवासी असून आरोपींपैकी मोहित यास ऑनलाईन जुगाराचा नाद लागला होता. समाज माध्यमांवर ऑनलाईन जुगार खेळण्यास त्याने सुरूवात केली होती. त्यासाठी त्याने सुरूवातीली स्वतः जवळील पैसे वापरले. पण त्यानंतर त्याने मित्रांकडून उधारीवर पैसे घेतले आणि ऑनलाईन जुगार खेळण्यास सुरूवात केली. त्यात तो सात लाख रुपये हरला. गेले वर्षभर तो जुगार खेळत होता. ऑनलाईन जुगारात सात लाख रुपये हरला होता. ते पैसे परत करण्याकरिता मोहितने सोनसाखळी चोरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने साथीदार रोहितलाही सोबत घेतले होते. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ९.८० ग्रॅम वजनाची (किंमत ९० हजार रुपये) सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या