मुंबई, (दादासाहेब येंधे) : बोलण्यात गुंतवून सोन्याची चेन चोरी करणाऱ्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी इगतपुरी येथून अटक केली आहे. मुनावर उर्फ अनवर हमीद शेख (वय, ५० राहणार-कुरेशी नगर, कुर्ला) असे त्याचे नाव असून त्याच्या अटकेमुळे आणखी सहा गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. अंधेरी पूर्वेकडील तेलेगल्ली परिसरात रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तिस शेख याने बोलण्यात गुंतवून त्याची २८ ग्रॅमची चेन बघण्यासाठी मागत ती लंपास केल्याची घटना १५ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे आणि पथकाने तपास सुरू केला होता.

चोरी करताना शेख याने छत्री घेतल्यामुळे त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नव्हता. सतत पाच दिवस सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करत पोलिसांनी शेख याची ओळख पटवली. मात्र, शेख हा सराईत गुन्हेगार असल्याने तो मोबाईलचा केव्हातरी वापर करत होता. परिणामी, त्याचे लोकेशन मिळू शकत नव्हते. त्याला पकडण्यास पोलिसांना अडथळे येत होते. अखेर तो रेल्वेने पश्चिम बंगाल येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, पोलीस अंमलदार सूर्यवंशी, शिंदे, लोंढे, म्हात्रे, पाटील, मोरे, विशाल पिसाळ यांनी मुनावर यास इगतपुरी येथे नाशिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक केली.
शेख हा डिसेंबर २०२४ मध्ये तुरुंगातून सुटला होता आणि त्यानंतर त्याने अशाच प्रकारचे आणखी सहा गुन्हे केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
0 टिप्पण्या