Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये घुसून अंमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त, ४०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबई पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अंमली पदार्थांची निर्मिती करणारी साखळी उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून, कर्नाटक येथील एका कारखान्यातून सुमारे ४०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्सचा कारखाना उद्धवस्त केला आहे. मुंबई पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी ४०० कोटींचा ड्रग्स साठा जप्त केला असून साकीनाका पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १८८ किलो एमडी  ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.


कर्नाटकमधून हे सर्व आरोपी मुंबई शहरात एमडी  ड्रग्ज  पुरवठा करत होते. आत्तापर्यंत एकूण ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या  ड्रग्ज प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासदरम्यान पोलिसांना म्हैसूरमधील ड्रग्स कारखान्याचा  उलगडा झाला होता. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी कर्नाटक राज्यात धाड टाकली. या कारवाईत ३९० कोटीचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.

याप्रकरणी परिमंडळ -१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कारवाईची माहिती दिली. एप्रिल महिन्याच्या शेवटी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्स प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे तपास करत असताना एका आरोपीकडून ५२ ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. याच प्रकरणात अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली. दोन आरोपींकडून ४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पकडण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांना म्हैसूरच्या कारखान्याचा तपास लागला. या आरोपींकडे एमडी  ड्रग्ज  पुरवठा हा म्हैसूरच्या बाहेर उभारण्यात आलेल्या कारखान्यातून होत होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती परिमंडळ-१० चे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.


सदर घटनेचा उत्कृष्ट तपास परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (मेघवाडी विभाग) संपत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) प्रदीप मैराळे, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे, पोलीस निरीक्षक युवराज क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल कारंडे आदींच्या पथकाने केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या