मुंबईतील पर्यावरण संवर्धन मोहीमेला मलेशिया आणि जपानच्या राजदूतांचा मदतीचा हात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ६ जून, २०२३

demo-image

मुंबईतील पर्यावरण संवर्धन मोहीमेला मलेशिया आणि जपानच्या राजदूतांचा मदतीचा हात

पर्यावरण दिन निमित्ताने नागरी वनीकरण मोहीमेअंतर्गत स्थानिक प्रजातीच्या २०० वृक्षांची लागवड


नागरी वनीकरण प्रकल्प अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदा पावसाळ्यात ५० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने ठेवले आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०० वृक्ष लागवड जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज (दिनांक ५ जून २०२३) करण्यात आली. जपान आणि मलेशियाचे राजदूत यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रातिनिधीक स्वरुपात झाडांची लागवड केली. तसेच मुंबईतील पर्यावरणाच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुढाकारांना त्यांनी पाठिंबा दर्शवला.

WhatsApp%20Image%202023-06-05%20at%205.23.58%20PM%20(1)


मलेशियाचे राजदूत श्री. अहमद झुवेरी युसुफ आणि जपानचे राजदूत श्री. फुकहोरी यसुकता यांनी वृक्षारोपण केले. कांचन आणि चाफा वृक्षांची त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात लागवड केली. यावेळी विद्यार्थ्यांशीही दोन्ही देशांच्या राजदूतांनी संवाद साधला. तसेच यंदाच्या पर्यावरण दिनाच्या मोहीमेसाठी पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.  

 


संपूर्ण मुंबई महानगरात सुमारे ३३ लाख वृक्ष आहेत. गत दोन वर्षांत ४ लाख स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या नागरी वनीकरण मोहीमेला सुरूवात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली.  येत्या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील २४ विभागांमध्ये स्थानिक प्रजातीचे वृक्ष लागवड हे स्थानिक लोकांच्या सहभागाने तसेच बिगर शासकीय संस्था आणि सामाजिक दायित्व जबाबदारी (सीएसआर) च्या माध्यमातून लावण्यात येतील, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली.


बहावा, अंजन, बकुळ, कांचन, अर्जुन, ताम्हण, बिवळा, आवळा, चिंच, आंबा, वड, पिंपळ, मोह, उंबर, पुतरंजिया यासारखी विविध स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड या मोहीमे अंतर्गत करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून ही वृक्ष लागवड करण्यात आली. येत्या काळात मुंबईतील वनीकरण वाढवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय नौदल तसेच अन्य विभागांच्या जागा शोधून त्याठिकाणी वनीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच महानगरपालिकेच्या अखत्यारितील जल अभियंता विभागाच्या जागांमध्येही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.


(जसंवि/१५३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *