मुंबई गुन्हे शाखा कक्ष-८ ने ई-कॉमर्स फसवणूक प्रकरणातील आंतरराज्य टोळीला अटक
मुंबई, : (दादासाहेब येंधे): वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळी मुंबई गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी डिलिव्हरी बॉक्समधील बारकोड स्टिकर चेन काढून, बनावट बारकोड लावून ई-कॉमर्स कंपन्यांची फसवणूक करत होती. या प्रकारात टोळीतील सदस्य स्वतःच्या मोबाईलवरून ऑर्डर देत आणि प्राप्त झालेल्या पार्सलमधील वस्तू स्वतःकडे ठेवत. त्यानंतर त्या बॉक्सवर बनावट बारकोड लावून रिकामा बॉक्स परत ई-कॉमर्स कंपनीकडे पाठवत. अशा प्रकारे त्यांनी अनेक ऑर्डरचे पैसे परत मिळवून आर्थिक फसवणूक केली होती.
गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीनुसार ०६ ऑक्टोबर रोजी चांदवळकर मार्ग, बोरीवली पश्चिम येथील एका डिजिटल स्टोअर्समध्ये सापळा रचून कारवाई केली. यावेळी संशयित चार व्यक्तींना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ डिलिव्हरी टेप, क्रेट्स, कार्टन्स, बारकोड स्टिकर्स तसेच विविध कंपन्यांच्या वस्तू आढळून आल्या. तपासात समोर आले की, हे आरोपी विविध ई-कॉमर्स कंपन्यांच्या वस्तूंच्या डिलिव्हरी प्रक्रियेत फेरफार करून कंपन्यांना फसवत होते.
अटक करण्यात आलेल्या या चौघांविरुद्ध बोरीवली पोलिस ठाण्यात कलम ३७९(८), ३४ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत गुन्हे शाखा कक्ष-८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.
या कारवाईमुळे ई-कॉमर्स कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर मोठा आघात झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तात्काळ कारवाईमुळे अनेक कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले असून पुढील तपास सुरू आहे.![]()

0 टिप्पण्या