हिऱ्यांची अदलाबदल करून फसवणूक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

हिऱ्यांची अदलाबदल करून फसवणूक

मुंबई, दादासाहेब येंधे : गुजरातमधील हिरेव्यापाऱ्याकडून एक कोटी १८ लाखांचे हिरे घेऊन त्याबदल्यात नकली हिरे देऊन फसविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. मुकेश गोपाणी आणि नरेश सवैया अशी त्यांची नावे असून लालबाग आणि कांदिवली परिसरातून त्यांची धरपकड करण्यात आली.


फेब्रुवारीमध्ये हिरे खरेदी करण्यासाठी मुकेश गोपाणी आणि नरेश सवैया हे दोघे गुजरातमध्ये गेले होते. सुरत येथील व्यापारी धर्मेश पवाशिया यांच्याशी संपर्क साधून दोघे त्यांच्या दुकानात गेले. स्वतःची खोटी ओळख सांगून त्यांनी हिरे दाखविण्यास सांगितले. धर्मेश यांनी एक कोटी १८ लाखांचे हिरे दोघांसमोर ठेवले. व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून दोघांनी असली हिरे आपल्या खिशात ठेवले आणि त्याजागी नकली हिरे ठेवले.


हिरे घेण्यासाठी नंतर पुन्हा येतो, असे सांगून  दोघेही दुकानातून बाहेर पडले. व्यापाऱ्याने हिरे तपासून पहिले त्यावेळी ते नकली असल्याचे लक्षात आले. दोघांचा आजूबाजूला शोध घेतला असता पसार झाल्याने त्यांनी गुजरातच्या महीधरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


दोन्ही आरोपी मुंबईचे असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. मात्र, अनेक दिवसांपासून ते सापडत नसल्याने त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळविले. गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक मिलिंद काठे यांच्यासह शिंदे, प्रभू, पावरी, शिवप्रसन्न पवार, अविनाश गावडे, योगेश उथळे यांच्या पथकाने दोघांचा शोध सुरू केला. गुजरात पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुकेशला कांदिवली येथून, तर नरेशला लालबाग येथून पकडून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.


चहा सांडवून हातचलाखी केली

दुकानात हिरे पाहत असताना धर्मेश यांनी दोघांसाठी चहा मागवला. दोघांपैकी एक चहा खाली सांडला. खाली पडलेला चहा पुसण्याचा बहाण्याने चलबिचल केली. त्याचवेळी दुसऱ्याने कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून हिऱ्यांप्रमाणे दिसणारे काचेचे तुकडे कागदाच्या पुडीत टाकले आणि हिरे पसंत नसल्याच व परत येतो असे सांगत दोघे दुकानातून बाहेर पडून पसार झाले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot