वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ‘विजयादशमी’ ला (दसरा) जनतेकरिता खुले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ‘विजयादशमी’ ला (दसरा) जनतेकरिता खुले

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना पर्यावरणाचा 
आनंद घेता यावा, म्हणून निर्णय 


मुंबई, दि. ३: मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय ! या उद्यान व प्राणिसंग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी ही दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दि. ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘विजयादशमी’ (दसरा) निमित्त म्हणजेच दस-याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. जेणेकरुन या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.


वरीलनुसार बुधवारी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार सदर प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. हे उद्यान दर बुधवारच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. त्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी ६.०० वाजता बंद होते. 


जसंवि/२६०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज