अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षणाचे
नियोजन
'ईको
इंडिया’ या संस्थेच्या पुढाकाराने देण्यात येत
आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
महानगरपालिकेची विविध रुग्णालये, प्रसूतिगृहे व आरोग्य केंद्रे येथे अविरतपणे
रुग्णसेवा करणा-या परिचारीकांना आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवांबाबत अद्ययावत
माहिती योग्यप्रकारे मिळण्यासह संबंधीत प्रशिक्षण देखील सुयोग्यप्रकारे मिळावे, या उद्देशाने गेल्या महिन्यापासून एक विशेष
प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम
उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या
प्रशिक्षण कार्यक्रमात ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ या विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या
प्रशिक्षणासाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत १ हजार ८८९ परिचारीकांची नोंदणी
झाली आहे. विशेष म्हणजे ‘ईको इंडिया’ या संस्थेद्वारे देण्यात येणारे हे प्रशिक्षण
पूर्णपणे मोफत असणार असून सुमारे ४ हजार ५०० परिचारीकांना टप्पेनिहाय पद्धतीने
बॅचेसमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक
आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवांबाबत सातत्याने संशोधन होत असते. तसेच या संबंधिच्या तंत्रज्ञानात देखील नियमितपणे प्रगती होत असते. यामुळेच आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवा देणा-या व्यक्तिंना अधिकाधिक परिणामकारक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यानुसार ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ (Infection Prevention & Control) याबाबत अधिक शास्त्रशुद्ध व अद्ययावत प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक परिचारीकांना मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळणा-या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग हा परिचारीकांना त्यांच्या दैनंदिन रुग्णसेवेत करता येणार आहे.
दर आठवड्याला एक दिवस याप्रमाणे सलग १३ आठवडे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. परिचारीकांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे सुलभ व्हावे, याकरीता त्यांना ईको इंडिया या संस्थेद्वारे टॅबलेट्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ८ कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सींगसाठी आवश्यक ती यंत्रसामुगी देखील सदर संस्थेद्वारे मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सर्व बाबींमुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे तसेच आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी कार्यरत असणा-या परिचारीकांना 'संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण' या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. 'संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण' हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक आरोग्य कर्मचा-याचे या बाबतचे ज्ञान सतत अद्यावत करणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन असून १३ मॉड्युल्सचे असणार आहे. यातील १० मॉड्युल्स हे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याबद्दल असून ३ मॉड्युल्स कार्यक्षमता कौश्यल्य याबाबत असणार आहेत, अशीही माहिती या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा