Ticker

6/recent/ticker-posts

सायबर हेल्पलाईनमुळे पोलिसांनी वाचवले १.२२ कोटी

चेंबूरमधील महिलेने वेळीच तक्रार दिली

मुंबई, दादासाहेब येंधे : सोशल मीडियाद्वारे शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उकळलेल्या रकमेपैकी एक कोटी २२ लाख २ हजार ६७१ रुपये विविध बँक खात्यांवर १२ तासांत गोठवून ते वाचविण्यात सायबर हेल्पलाइन पथकाला यश आले आहे.


चेंबूरमधील एका महिलेच्या सोशल मीडियाद्वारे काही लोक तिच्या संपर्कात आले. प्री आयपीओ, ग्रे मार्केट ट्रेडिंग अंतर्गत शेअर मार्केटमध्ये लवकर नफा मिळवून देऊ, असे आमिष तिला त्यांनी दाखविले. त्याकरिता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिला ॲड करून घेत लिंकद्वारे पाठविलेले ॲप डाऊनलोड करण्यास तिला भाग पाडले. शिवाय आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगत २ कोटी ६ लाख १९० हजार रुपयांची फसवणूक केली. या महिलेने अखेर १९३० या सायबर हेल्पलाइनवर फोन करून याची माहिती दिली. सायबर पोलिसांच्या कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, निवृत्ती बावस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली. संबंधित बँक नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळे सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या रकमेपैकी एक कोटी २२ लाख २ हजार ६७१ रुपये संबंधित बँक खात्यावर गोठवून वाचविण्यात यश आले. दरम्यान, सोशल मीडियावर अशा जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये सायबर गुन्हेगार वैयक्तिक किंवा विविध कंपन्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास प्रवृत्त करतात. परंतु सेबीद्वारे रजिस्टर कोणतीही कंपनी वैयक्तिक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून भरघोस नफा मिळवून देण्याच्या जाहिरातीची पडताळणी करावी. कोणावरी लगेचच विश्वास ठेवू नये. तसेच अशी फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या