मुंबई खंडणी विरोधी पथकाची जबरदस्त कारवाई
मुंबई, दादासाहेब येंधे : प्राणघातक अग्निशस्त्र विकण्याच्या उद्देशाने ते जवळ बाळगणाऱ्या तीन आरोपींच्या मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पायधुनी परिसरात त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ पिस्टल, १रिव्हॉलवर, ३गावठी कट्टे आणि तब्बल ६७ जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पायधुनी परिसरात प्रभू हॉटेल जवळ तिघेजण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून ३ आरोपींना नुकतीच अटक केली आहे.

अभिषेक कुमार पटेल (वय २६ वर्षे), सिद्धार्थ सुभोध कुमार गोलू (वय २३ वर्षे) आणि रचित रमशिषकुमार मंडळ (वय २७ वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या सर्व आरोपींच्या विरोधात पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून या आरोपींनी हा अग्निशस्त्राचा साठा कुठून आणला होता, मुंबई शहरात ते कोणाला विकणार होते, त्यांचे टार्गेट कोण होते या संदर्भात अधिक तपास मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक करत आहे.
0 टिप्पण्या