मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत अंमली पदार्थांची नशा करणाऱ्या गांजाची विक्री करणाऱया एका ड्रग्ज विक्रेत्याला मुंबई गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. सातरस्ता येथे कारवाई करत पोलिसांनी तस्कराच्या घरातून जवळजवळ ३८ किलो ११७ ग्रॅम वजनाचा व नऊ लाख ५२ हजार किंमतीचा गांजाचा साठा जप्त केला आहे.
सातरस्ता येथील विठ्ठल निवास येथे राहणाऱया एका २७ वर्षीय तरुणाने त्याच्या घरात मोठय़ा प्रमाणात गांजाचा साठा करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-४ ला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक लता सुतार, निरीक्षक नितीन पुंभार व पथकाने त्या तरुणाच्या घरावर पाळत ठेऊन घराची झडती घेतली. त्यावेळेस त्या घरात ३८ किलो ११७ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा मिळून आला. त्या आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेला आरोपी हा छोटय़ा पुड्यांमधून नशेबाजी करणाऱ्यांना गांजाची विक्री करत असायचा. बऱ्याच दिवसांपासून तो गांजाविक्रीचा धंदा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
0 टिप्पण्या