मुंबई, दादासाहेब येंधे : धारावीच्या पिवळा बंगला परिसरात गुरुवारी रात्री गर्दुल्ल्याने धावत्या बेस्ट बसमध्ये कंडक्टरवर चाकूने सपासप वार करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गर्दुल्ल्याने बस कंडक्टर कडील पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता विरोध केल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. यावेळी पैशाची बँक हिसकवता न आल्याने अखेर गर्दुल्ला कंडक्टरचा मोबाईल घेऊन पसार झाला. मात्र, पोलिसांनी काही वेळातच त्याला अटक केली आहे. या हल्ल्यात बस कंडक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पालिकेच्या सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बेस्टची विक्रोळी आगाराची मार्ग क्रमांक ७ वरील बस ही गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता धारावीतील पिवळा बंगला येथे पोहोचली असताना सदर प्रकार घडला आहे. बसमध्ये चढलेल्या गर्दुल्ल्याने बस वाहक अशोक डागळे (वय, ४४) यांच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची बॅग हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सदर गर्दुल्ल्याचा हात पकडून त्याला प्रतिकार केला असता त्या गर्दुल्ल्याने डागळे यांच्यावर चाकूने सपासप वार करत हल्ला चढवला. डागळे यांच्या विरोधामुळे गर्दुल्ल्याने त्यांच्या छातीवर तसेच पायावर चाकूने वार केले. यात डागळे हे रक्तबंबाळ झाले. गर्दुल्ल्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला पुढील काही वेळातच अटक केली.

या घटनेत वाहक डागळे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा