गर्भवती महिलेसाठी पोलीस आले धावून - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

गर्भवती महिलेसाठी पोलीस आले धावून

मुंबई, दादासाहेब येंधे : गर्भवती महिलासाठी डोंगरी पोलिसांचे 'निर्भया' पथक धावून आल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. प्रसुतीसाठी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. महिला पोलिसांच्या सदर घटना नजरेस पडताच बॅनर आणि ताडपत्रीची मदत घेऊन महिलेला झाकून तिची दुसऱ्या महिलेकडून प्रसूती करून घेतली. महिलेवर जे. जे. रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. डोंगरी पोलिसांच्या निर्भया पथकाने अभिमानास्पद कर्तव्य बजावल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

मुंबई पोलीस हे सदैव नागरिकांच्या मदतीला धावून जात असतात. कोणी जखमी असो वा कुणाचा अपघात झालेला असो किंवा रस्त्यावरील बेघरांना देखील रुग्णालयात नेऊन उपचार करताना दिसून येतात. खाकी वर्दी नेहमीच आपल्या कर्तव्याला जागत असते. अशीच एक घटना नुकतीच दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात पहावयास मिळाली. डोंगरीचा चार नळ परिसर हा नेहमीच गर्दीने भरलेला परिसर असतो. तेथे डोंगरी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल तसेच गुजर, जाधव, पाटील, राऊत, फड, सोनवणे हे चार नळ परिसरात गस्त करत होते. तेव्हा एक महिला प्रसूतीसाठी जात असताना तिची रस्त्यातच अर्धवट प्रसुती झाल्याचे खंडेलवाल आणि त्यांच्या पथकाला दिसून आले. त्यानंतर सदर निर्भया पथकाने तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली असता ती प्रसूतीसाठी जात असल्याचे समजले.


त्या दिवशी सकाळी पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी बाजूला असलेले बॅनर आणि ताडपत्री घेऊन तात्काळ महिलेला झाकले व एका महिलेच्या मदतीने तिची प्रसूती केली. महिलेने मुलाला जन्म दिला. सदर महिलेला रक्तस्राव अधिक झाल्याने पोलिसांनी मदतसाठी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नव्हती. तेव्हा निर्भया पथकाने महिलेला पोलिसांच्याच गाडीतून जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर महिला ही मुंब्रा येथे राहते. ती सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातून प्रकृतीसाठी जे.जे. रुग्णालयात जात असताना तिला त्रास होऊ लागला होता. परंतु निर्भया पथक वेळीच धावून आल्यामुळे सदर महिलेचा व तिच्या बाळाचा जीव वाचला आहे.


पोलीस आयुक्त यांनी देखील सदर पथकाचे ट्विटरवर मेसेज करून अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज