रंगारी बदक चाळीत अवतरले श्री स्वामी समर्थ - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

रंगारी बदक चाळीत अवतरले श्री स्वामी समर्थ

मुंबई, दादासाहेब येंधे : श्री स्वामी समर्थांनी ज्या वटवृक्षाखाली साधना-आराधना केली, त्याचे स्थानमहात्म्य लक्षात घेता 'वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा' असा पर्यावरणपूरक संदेश 'रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने दिला असून मंडळाचे यंदाचे ८५ वे वर्ष आहे.

स्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामी सूत यांनी सांगितलेल्या स्वामी समर्थांच्या बाल स्वरूपाच्या प्रकट दिनाचे कथानक रंगारी बदक चाळीच्या पारंपरिक देखाव्यातून साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वडाच्या झाडाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. जगभरात वाढत्या प्रदूषणाने तापमानवाढ होऊन पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्राणवायू देणाऱ्या झाडांचीही सर्रास कत्तल केली जात आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सजीवसृष्टीला आवश्यक असलेला प्राणवायू वातावरणात सोडण्याचे कार्य बजावणाऱ्या वटवृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या बहुगुणी झाडावर नानाविध पशू-पक्ष्यांचाही अधिवास असतो. वडाचे आयुष्य हजारो वर्षे असते. वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो. त्याच्यापासून आसपासच्या लोकांना शुद्ध प्राणवायू मिळतो. एक पूर्ण विकसित वडाचे झाड तासाला ७१२ किलो प्राणवायू वातावरणात सोडते. अलीकडच्या काळात विदेशी झाडे लावण्याचे फॅड वाढत असल्याने वड-पिंपळासारखी वर्षानुवर्षे जगणारी झाडेच दुर्मीळ होत चालली आहेत. त्यामुळे वड वाचविण्याचा पर्यावरणस्नेही संदेश देण्याच्या उद्देशाने आम्ही 'स्वामी वृक्ष' ही संकल्पना साकारली आहे. त्यामागे वटवृक्षांचे जतन व संवर्धन करण्यात यावे हीच अपेक्षा असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष सकपाळ यांनी सांगितले. 

यानिमित्ताने लालबागमध्ये अक्कलकोट अवतरले आहे. संत ही परंपरा आपल्याकडे वेगळी ओळख करून देणारी आहे. या संतांमध्ये काही सिद्धपुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या वाणीतून आणि आचरणातून सकारात्मक बदल घडवला. त्यातीलच एक नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनप्रवासात न्याय व्यवस्था, अन्नदान आणि आपण प्राण्यांवर का प्रेम केले पाहिजे? निसर्ग हाच आपला गुरू आहे, निसर्गावर प्रेम करा, निसर्गातील रूढी-परंपरा यावर प्रेम करा, अशा विविध गोष्टी सांगत त्यांनी समाजात सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


तोच अचूक संदेश विविध देखाव्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. लालबागमध्ये प्रथमच पर्यावरणपूरक आणि भव्यदिव्य असा मुख्य प्रवेशद्वार व देखावा कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी साकारला आहे. तर लाडक्या लंबोदराचे आगळेवेगळे रूप मूर्तिकार दिनेश सारंग यांनी घडवले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज