मुंबई, दि..२ : डॅनियल या व्यक्तीची अमली पदार्थ प्रकरणी झडती घेण्याच्या नावाखाली त्याच्या खिशात हळूच एमडीची पुडी ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलिस ठाण्याच्या सब-पोलिस इन्स्पेक्टरसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
मुंबई पोलीस दलात एक घटना अशी घडली आहे ज्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम चार पोलिसांनी केलं आहे. या चारजणांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदार यांचा समावेश आहे. या चौघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओत एका माणसाच्या खिशात ड्रग्ज ठेवताना हे चौघे दिसत आहेत.
व्हिडिओ पहा👇
हे सर्वजण खार पोलिस ठाण्याच्या दहशतवादविरोधी कक्षाचे अधिकारी आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओत कलिना परिसरात ड्रग्जशी संबंधित उद्देशाने एका व्यक्तीची झडती घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. तसेच या दरम्यान एक अधिकारी २० ग्रॅम मेफेड्रोन ताब्यात घेण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या खिशात एखादी वस्तू ठेवताना दिसत आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट रोजी घडला असून याचा व्हिडीओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर ते चौघे खार पोलिस ठाण्याचे असल्याचे उघड झाले.
कायदेशीर पद्धतीचा अवलंब केला नाही
व्हायरल व्हिडीओमध्ये झडती घेताना कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने त्या पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली.
सांताक्रुझच्या कलिना परिसरात शहबाज खान हे जनावरांचे फार्म चालवतात. त्यांच्याकडे जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. तर डॅनियल हा खान यांच्यासोबत काम करतो. त्याच ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली आणि सर्व प्रकार उघडकीस येऊन त्याची मुक्तता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा