बेकायदा टेलिफोन एक्सचेंज पोलिसांनी केले उद्धवस्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

बेकायदा टेलिफोन एक्सचेंज पोलिसांनी केले उद्धवस्त

मुंबई, दादासाहेब येंधे : भिवंडीत बेकायदा सुरू असलेल्या टेलिफोन एक्सचेंजला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)  उध्वस्त केले आहे. या कारवाईत नऊ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिमकार्डे, आठ वायफाय राऊटर, सिम बॉक्स चालवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या १९१ अँटेंनांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या उद्देशाने हे एक्सचेंज चालवणाऱ्या जाफर बाबू उस्मान पटेल (वय, ४०) याला एटीएसने नुकतीच अटक केली आहे. 


बेकायदा सिम बॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवण्यात येत असल्याची माहिती एटीएसला ३१ जुलैला मिळाली होती. त्याआधारे एटीआयच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतील नालासोपारा, नवीन गौरी पाडा आणि रोशन बाग येथे छापे टाकून बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. या कारवाईत दिनस्टार कंपनीचे नऊ सिम बॉक्स, विविध कंपन्यांची २४६ सिमकार्डे, विविध कंपन्यांचे आठ वाय-फाय राऊटर, सिम बॉक्स चालवण्यासाठी वापरण्यात येणारे १९१ अँटेंना आणि सिम बॉक्स कायम कार्यान्वित राहण्यासाठी वापरण्यात येणारे इन्व्हर्टर असा जवळजवळ एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


गेल्या दीड वर्षापासून हे टेलिफोन एक्स्चेंज सुरू होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाचे जवळजवळ तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी एटीएसने पटेल याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. पटेल त्याच्या साथीदारांच्या मदतीने पैसे कमावण्यासाठी हे एक्सचेंज चालवत होता. त्यामुळे दूरसंचार विभाग व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होताच एटीएसने सदर कारवाई केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज