मित्राची हत्या करून चढली दारूची झिंग, पोलिसांनी बॅग उघडताच फुटलं हत्येचं बिंग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

मित्राची हत्या करून चढली दारूची झिंग, पोलिसांनी बॅग उघडताच फुटलं हत्येचं बिंग

मुंबई, दि. ८ : मध्य रेल्वेमार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती.

आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झाले होते, यानंतर आरोपीने त्याला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलावले, या वेळी आरोपीनं चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.


जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांनी अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या करुन त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्स्प्रेसने कोकणात घेऊन चालला होता. मात्र, रेल्वे पोलिसांना जय चावडाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली आणि त्यामध्ये रक्ताने माखलेला अर्शदचा मृतदेह आढळून आला. मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्याप्रकरणाचा घटनाक्रम समोर आला आहे.


कलिना सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या मूकबधिर अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. तो छोटी-मोठी कामे करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. पायधुनी येथील गुलाल वाडी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील जय प्रवीण चावडा (वय ३२) आणि शिवजीत सुरेंद्र सिंग (वय ३३) यांच्यासोबत त्याची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती. जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये अॅनिमेशनचे काम करतो. त्याची आई, भाऊ कॅनडामध्ये असतात. तर शिवजीत हा बेरोजगार आहे. प्रत्येक रविवारी तिघेही जयच्या घरी दारू पार्टी करायचे. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले होते. आठच्या सुमारास दोघे दारू पिऊन आले. तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये बाचाबाची सुरू होती. अर्शदच्या पत्नीवरून शिवजीतसोबत त्याचे भांडण सुरु होते. याच बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.


शिवजीतने अर्शदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली. जय त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढत होता. त्याचदरम्यान शिवजीतने रूममध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याने जयला धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितले. साडेआठच्या सुमारास अर्शदची हत्या झाल्यानंतर तासाभरानेच शिवजीतच्या मदतीने जयने सुटकेस खाली आणली. इमारतीच्या खाली टॅक्सी पकडली. शिवजीत सुटकेस टॅक्सीच्या मागच्या सीटवर ठेवून तो निघून गेला. दादरच्या फलाट क्रमांक ११ वर जय याने सुटकेस घेऊन तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रेल्वे पोलिसांना त्याच्या हालचालींचा संशय आल्याने झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळील बॅगमध्ये मृतदेह आढळून आला.

दरम्यान, रेल्वे पोलिसांना सुटकेसमध्ये अर्शदचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांनी जयची चौकशी सुरु केली. मात्र, जय मूकबधिर असल्याने तो काय बोलतोय, हे पोलिसांना कळत नव्हते. अखेर मूकबधिरांची भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलावून जयची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्राथमिक चौकशीनंतर अर्शदची हत्या नेमकी का झाली असावी, याबाबत अद्याप संभ्रम आहे. कारण, जय आणि शिवजीत यांच्या जबानाती तफावत आढळून आली आहे. या दोघांनी सुरुवातीला एका मुलीच्या प्रकरणातून हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या वेळी दोन लाख रुपये देणे असल्याच्या वादातून काटा काढल्याचे सांगितले. त्यामुळे हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अर्शदचे हात बांधून त्याला मारताना शिवजीतने एका युवतीसह दोघांना व्हिडीओ कॉल केला होता. शिवजीतने अर्शदला नग्न करुन त्याला मारहाण केली. त्यावेळी अर्शद जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता. व्हिडीओ कॉलमधील व्यक्त्ती तिसऱ्या मूकबधिर व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून मारहाणीचे लाइव्ह चित्रण दाखवत होती. ती युवतीदेखील अर्शदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडीओ कॉलमधील व्यक्ती मास्टरमाइंड असून ती दुबईत असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. हे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज