चार जणांना अटक
नवी मुंबई, दि.१९ : खारघर, सेक्टर ३५ मधील बीएम ज्वेलर्समधील अकरा लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. या प्रकरणात लुटलेल्या दागिन्यांसह देशी बनावटीची २ पिस्तूल, २ मॅगझीन, ३ जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सात लाख ५० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

खारघर, सेक्टर- ३५ मधील एमबी ज्वेलर्सवर २९ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला होता. लुटारूंनी पिस्तुलाने गोळीबार करत दुकानातील अकरा लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले होते. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींची शोध मोहीम सुरू केली होती. या वेळी आठ दिवस सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीनंतर गुन्ह्यातील चार आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत, उदयपूर, नेरळ, माथेरान येथून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे व दरोड्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अटक केलेल्यामध्ये मो. रिझवान मो. अलीशेख (२७), अझरुद्दीन हुसनोदीन शेख (२८), ताहा तनवीर परवेझ सिंधी (२१) व राजवीर रामेश्वर कुमावत (२०) यांचा समावेश आहे. यातील अझरुद्दीन हुसनोदीन शेखवर गुजरातमधील वालीया, नवसारी, पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे आहेत; तर मो. रिझवान मो. अलीशेख याच्यावर गुजरातमधील सचिन पोलीस ठाणे तसेच रखीयाल पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा