पोलिसांकडून २९० दुचाकी जप्त
मुंबई, दि. १५ : मुंबईत ई-बाईक चालकांकडून नियम मोडण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अनेक दुचाकींवर गाडी क्रमांक नसल्याने कारवाई करण्यात पोलिसांना त्रास होत होता. नागरिकांकडून देखील अशा दुचाकी चालकांविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. याचीच दखल घेत वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यादरम्यान २२१ दुचाकी चालकांवर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल केले असून २९० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांत ई-बाईकची संख्या खूप वाढली आहे. मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करता येत नसल्याने ई-बाईक चालवणारे वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत होते. मुंबई वाहतूक पोलिसांकडेही नागरिकांच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत होत्या. ई-बाईक चालक वाहतूक नियमांचा भंग करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण करत होते. ई-बाईक चालकांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून पोलीस सहायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या तीन दिवसात विशेष मोहीम हाती घेतली होती. तीन दिवसांच्या या मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२१ ई-बाईक चालकांवर गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून २९० ईबाईक जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या २७२, सिग्नल मोडणाऱ्या ४९१, नो एन्ट्री मध्ये वाहन चालवणाऱ्या २५२ आणि स्थानिक गुन्हे १६१ अशा एकूण ११७६ ई-बाईक वर कारवाया करून त्यांच्याकडून १ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ई-बाईक्स चालक व डिलिव्हरी बॉईज आढळून आल्यास मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाइनवर तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनाही पोलिसांच्या वतीने सक्त ताकीद देण्यात येणार आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा