मुंबई, दादासाहेब येंधे : आंतरराज्यीय स्तरावर बेकायदा शस्त्रांची विक्री करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून आठ आधुनिक पिस्तूले व १३८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एम. गुलाब चौधरी (वय, ५३-उत्तरप्रदेश), धवल देवरामनी उर्फ धवल उर्फ अनिल (वय, ३४-नवी मुंबई) पुष्पक जगदीश माडवी (वय, ३८-नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती ३० जूनला गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, कक्ष ९ ने जुहू येतील म्हाडा कॉलनी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत एक विदेशी विनावटीचे स्टीलचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतसे आढळून आली. आरोपीच्या चौकशीनंतर आणखी पाच पिस्तूल आणि १२१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या साथीदारांकडूनही दोन पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत एम. गुलाब चौधरी हा २०१० पासून राज्यातील विविध भागांतून शस्त्रे आणून त्यांची मुंबईसह विविध भागात विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश मध्ये चार गुन्ह्यांची नोंद आहे. पुष्पक आणि धवल हेदेखील रेकॉर्डवरील आरोपी आहेत. या आरोपींनी आतापर्यंत किती जणांना शस्त्रास्त्रांची विक्री केली या शस्त्रास्त्रांचा कुठल्या गुन्ह्यात वापर झाला आहे का याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा