दंगलीतील आरोपिला ३१ वर्षांनी अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

दंगलीतील आरोपिला ३१ वर्षांनी अटक

मुंबई, दि. ६ : मुंबईतील १९९३ च्या दंगलीतील फरार आरोपीला ३१ वर्षांनी अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सय्यद नादिर शहा अब्बास खान (वय, ६५) असे त्याचे नाव असून तो ओळख बदलून कोल्हापूर तसेच वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होता.


मुंबईतील दंगलीदरम्यान बेकायदा जमाव जमविणे, हत्येचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यात सय्यद खान याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने खान याला जामीन मंजूर केल्यानंतर शिक्षा होण्याच्या भीतीने तो फरार झाला होता. त्यानंतर खटल्यास तो कधीच हजर न झाल्याने खान याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. फरार आरोपींचे रेकॉर्ड तपासत असताना खान याचे नाव आढळल्यानंतर किडवई मार्ग पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह सुरेश कडलग, अशोक लाडे, मधुकर मंडलिक, निकम, दळवी, यादव यांच्या पथकाने पुन्हा नव्याने खान याचा शोध सुरू केला होता.


शिवडी येथील इस्माईल बिल्डिंगमध्ये खान याचे वास्तव्य होते याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी तेथून माग घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचे कुटुंब खान बाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. कुटुंब त्याच्या संपर्कात असल्याच्या पोलिसांना संशय होता. त्यानुसार सर्वांचे कॉल रेकॉर्ड काढण्यात आले. त्यात सापडलेल्या एका संशयित क्रमांकावरून खान हा कोल्हापूर येथे असल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या तयारी असतानाच तो मुंबईत येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार शिवडी येथे पोलिसांनी सापळा रचून खान यास शिताफीने अटक केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज