मुंबई, दि. १५ : मुंबई शहर व उपनगरांमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांच्या मुळांभोवती असलेले सिमेंट क्राँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण दूर करण्याची मागणी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांनी लेखी पत्राद्वारे बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तसेच महापालिका उद्यान अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक जुने आणि विविध प्रजातीचे मोठे वृक्ष आहेत. रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण करतांना अशा वृक्षांच्या मुळांभोवती डांबर आणि सिमेंटचा घट्ट विळखा पडलेला ठायी ठायी दिसून येतो. वृक्षांच्या मुळांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने त्यांचे आयुष्य कमी होतेच; शिवाय वादळ वारा आल्यास हे वृक्ष मुळासकट उन्मळून पडतात. जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल प्रकर्षाने जाणवू लागला आहे. अशा परिस्थितील वृक्ष संवर्धन आणि जतन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे आाणि स्थानिक स्वराज्य संस्थेचेही आद्य कर्तव्य असायला हवे. बऱ्याच विकास कामांस अडथळा वृक्षांची वृद्धांची अपरिहार्यपणे छाटणी / तोडणी करावी लागते. त्यामुळे मुंबई शहरातील वृक्षांची संख्या कमी होत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई शहर आणि उपनगरातील झाडांच्या मुळांभोवतीचे सिमेंट काँक्रीट व डांबर विनाविलंब दूर करावे असे माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तथाति, मुंबई महानगरपालिकेकडून त्याबाबत ठोस कार्यवाही करण्यात होत असल्याचे दिसून येत नाही. त्या बाबत तक्रार केली असता, हे काम उद्यान विभागाचे आहे की रस्ते विभागाचे यावर एकमत होतांना दिसत नाही. त्यामुळे समस्येचे निराकरण न होता, ती अधिकच गुंतागुंतीची होते. पर्यावरणस्नेही भूमिका घेऊन मुंबई शहर आणि उपनगरांतील वृक्षांभोवतीचे सिमेंट क्राँक्रीट आणि डांबर त्वरित दूर करण्याचे संबंधित विभागास आदेश देण्यात यावेत असे पत्रात नमूद केले होते. याबाबत सुयोग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन उद्यान अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी श्री. नर यांना दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा