परप्रांतीय पुजाऱ्यांचे घृणास्पद कृत्य
कळवा, दि. १३ : शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरात एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे डोके जमिनीवर आपटून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेतील शाम सुंदर शर्मा(वय ६२), संतोषकुमार मिश्रा (वय ४५), राजकुमार पांडे (वय, ५४) या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरात ३० ते ३२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची तक्रार शीळ डायघर पोलिसांत दाखल झाली होती, त्यानुसार शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तीन पोलीस पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मंदिर परिसरातील गोशाळामध्ये सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणून चौकशी केली असता, मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीने त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. शीळ डायघर पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात चौकशी केली असता, मृत महिलेच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे (वय, ३०) घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (ता. ६) सकाळी १० वाजता ती शीळ गाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात अटक केलेले आरोपी दारू पीत होते.
दरम्यान, महिला एकटी असल्याने तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी त्या महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींवर कारवाई केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा