Ticker

6/recent/ticker-posts

खोट्या कागदपत्रांद्वारे वाहनकर्ज घेणाऱ्यास अटक

मुंबई, दि. ६ : महागडी वाहने खरेदी करण्याच्या बहाण्याने खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे बँकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तीन जणांना अटक केली. महागड्या कार खरेदी करून ही टोळी कर्जाची रक्कम जमा न करता त्या कारची परस्पर विक्री करत होते.


आधारकार्ड, पॅन कार्ड व प्राप्तिकर परताव्याची कागदपत्रे यांच्यात सोयीनुसार बदल करून, तन्मय तापस सरकार या नावाने ४५ लाख रुपयांचे वाहनकर्ज घेऊन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार मलबार हिल येथील एका बँकेच्या व्यवस्थापकाने केली. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंत सहायक निरीक्षक योगेश माने, उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान इम्रान मेहरहदिनखान हुसैन या आरोपीचे नाव समोर आले आणि तो लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली.


पोलिसांनी जयपूर ते वांद्रे या दरम्यान धावत्या ट्रेनमधून हुसैन याला शोधले आणि अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून टोयोटा फॉर्च्युनर कार हस्तगत केली. तपासामध्ये ज्या नावाने कर्ज घेण्यात आले, त्या आरोपीचे खरे नाव अस्फाक मुनाफभाई अजमेरी असल्याचे कळले. गुन्हा दाखल होताच, अजमेरी  वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत होता. कार डीलर असलेल्या अजमेरी यालाही पोलिसांनी शोधून काढले.


या टोळीने खोट्या नावांनी कागदपत्रे तयार करून देणाऱ्या साईनाथ व्यंकटेश गंजी उर्फ विकास यास पोलिसांनी पकडले. हाच या टोळीचा मुख्य आरोपी असून तो कौशल भियाणी या नावाचा वापर करत होता. त्याच्या विरोधात व्ही. पी. रोड पोलिस ठाणे, कुर्ला पोलिस ठाणे तसेच शुन्हे शाखेमध्येही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या