५ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई, दि. ५ : जामिनासाठी लागणारी बनावट कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदार न्यायालयांमध्ये हजर करत आरोपींना जामीन मिळून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी अमित गिजे, बंडू कोरडे, अहमद शेख, संजीव गुप्ता आणि उमेश कावले या पाच आरोपींना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि अन्य जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींना जमिनीसाठी लागणारी आधार कार्ड, रेशन कार्ड, वेतन पावती, बँक स्टेटमेंट अशी वेगवेगळ्या नावाच्या जामीनदारांची बनावट कागदपत्रे, मानखुर्द मधील महात्मा फुले नगरात बनवून दिली जातात. त्यावर विविध शासकीय आणि खाजगी कार्यालयांचे बनावट रबरी शिक्के मारून ही कागदपत्रे तोतया जामीनदाराला देत न्यायालयांसमोर उभे करून आरोपींना जामीन मिळवून दिला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाने मानखुर्द महात्मा फुले नगर मध्ये छापा टाकून विजय कोरडेला ताब्यात घेतले. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छेडानगर मधून शेख, भिवंडी मधून गुप्ता आणि कल्याण मधून कावले यास अटक केली आहे.
आरोपींजवळून वेगवेगळ्या नावांचे बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड वेगवेगळ्या कंपन्यांची ओळखपत्रे, पॅन कार्ड, महानगरपालिकेच्या कर पावत्या, लॅपटॉप, मल्टीपल प्रिंटर, मिनी लॅमिनेटर, एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने तयार केलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट विविध कंपन्यांची ओळख पत्रे अशी बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा