९ सोमालियन चाच्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे
मुंबई, दि. ४ : समुद्रात पाकिस्तानी मच्छीमारांचे अपहरण करणाऱ्या ९ सोमालियन चाच्यांना भारतीय नौदलाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याविरुद्ध यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मेरिटाईम अँटी पायरसी ऍक्ट २०२२ अंतर्गत देशातील हा दुसरा गुन्हा आहे. पहिला गुन्हा नौदलाच्या कारवाईवरून मुंबईत दाखल झाला आहे.

व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची गस्त सुरू असताना २८ मार्च रोजी आयएनएस त्रिशूल आणि सुभेदा यांना इराणी ध्वज असलेल्या एआय कंबर या मासेमारी जहाजाचे अपहरण झाल्याचा संदेश मिळाला. नौदलाने सोमालियापासून जवळ असलेल्या या जहाजाच्या दिशेने कूच केले. ओलीस ठेवलेल्या पाकिस्तानी मच्छीमारांची सुटका करण्याचे आवाहन नौदलाने केले. मात्र, तसे न करता चाचे पळू लागले. नौदलाच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले आणि ते जहाजावर उतरले. ९ सोमालियन चाच्यांना ताब्यात घेऊन २३ जणांची सुटका केली. सोमालियन चाच्यांनी त्यांच्याकडील शस्त्रे पाण्यात फेकली. त्यांच्याकडे एके ४७ रायफल, हँड ग्रेनेड, लॉकेट रॉंचर होते अशी माहिती मच्छीमारांनी दिली.
नौदलाने चाच्यांना मुंबईत आणून येलोगेट पोलिसांच्या ताब्यात दिले. चाच्यांविरुद्ध अपहरण, सरकारी कामात अडथळा, मेरीटाईम अँटी पायरसी ऍक्ट २०२२, हत्यार कायदा, पासपोर्ट अधिनियम तसेच परकीय नागरिक कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा