सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून अटक

गुन्हेगारांच्या शोधासाठी १२ पथकं होती तैनात


मुंबई, दादासाहेब येंधे : अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घरावर एकूण सहा राऊंड फायर केले. दरम्यान गोळीबार करणाऱ्या त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. ४८ तासांच्या अर्थात अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी त्यांना भुज येथून अटक केली आहे.


या दोन्ही आरोपींना १०  दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून २५ एप्रिलपर्यंत ते पोलिस कोठडीत असतील. पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी दोन आरोपींची नावे असून सागर पाल याने हा गोळीबार केला होता. दोन्ही आरोपींना कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली.


१४ एप्रिलला पहाटे अभिनेता सलमान खान यांच्या घरी झालेल्या गोळीबाराप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. या प्रकरणात १२० बी कलम वाढवण्यात आलं. सलमानच्या घरी गोळीबार करताना आरोपींनी ५ राउंड फायर केले होते, त्यापैकी एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीमध्येही गेली होती. बाईकवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची १२ पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींची मिळवण्यात आली. तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडे आरोपींचे लोकेशन होते पण त्यांच्याकडे शस्त्र असल्याची शक्यता होती म्हणून गुजरातमधील स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. आजा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. बिश्नोई गँगशी सबंधित ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तिथे आम्ही चौकशी करत आहोत माहिती घेत आहोत आणि त्या तपासयत्रणांच्या संपर्कात राहून तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितलं. गेल्या काही काळापासून दोन्ही आरोपी पनवेलमधल्या घरात राहत होते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपींनी सलमनाच्या घराबाहेर ज्या पिस्तूलातून गोळीबार केला, ती पिस्तुल काही पोलिसांना अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. आरोपींच्या झडतीत कोणतेही हत्यार सापडले नाही. चौकशीत आरोपी उघडपणे काही सांगत नाहीत. गोळीबारानंतर फरार होताना आरोपींनी हत्यार कुठेतरी लपवून ठेवल्याचा किंवा फेकून दिल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पिस्तूल शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांना जिवंत काडतूसही सापडले असून, बॅलेस्टिक अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज