शेअर मार्केट फसवणुकीकरिता 'एमपी'त थाटले कॉल सेंटर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

शेअर मार्केट फसवणुकीकरिता 'एमपी'त थाटले कॉल सेंटर

मुंबई, दि. १३ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणुकीसाठी मध्य प्रदेश मध्ये सुरू केलेले कॉल सेंटर उध्वस्त करीत या टोळीच्या मुख्य आरोपीसहित त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. 


राज बहादुर रामसिंग भदोरिया, अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे आणि संजय भगवानदास बैरागी अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या कॉल सेंटरमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा मोबाईल डेटा आढळून आला आहे.


चंद्रशेखर तावरे यांना फेब्रुवारीत अनोळखी व्यक्तीने फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भात आणि प्रॉफिट बुल अँड एल.बी. इंटरप्राइजेस, बंगळूर या कंपनीबाबत माहिती दिली. पुढे त्यांनी तावरे यांना बनावट लिंक पाठवून प्रॉफिट बुल नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पडले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून एकूण ८ लाख ३३ हजार रुपये उकळले. ॲपमध्ये नफ्याची रक्कम दिसत होती. मात्र, पैसे काढता येत नव्हते. त्यांचेच पैसे काढण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे तावरे यांना संशय येताच त्यांनी पैसे पाठविण्यास नकार दिला. तसेच माटुंगा पोलिसांना याबाबत कळवून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार यांच्या पथकाने तपास सुरू केला.


आरोपींच्या बँक खात्यांचे विश्लेषण करून पोलिसांनी मध्य प्रदेशातील ग्वालियर मधील रहिवासी आरोपी भादोरिया याची माहिती मिळवली. त्याला ६ एप्रिलला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली. 


पोलिसांनी त्याच्याकडून चार डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, चार बँक खात्यांची चेक बुक, तीन मोबाईल आणि पाच सिम कार्ड जप्त केली. भदोरीयाच्या चौकशीत तो पैसे काढून उज्जैन, इंदूर येथे पाठवत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास करीत विजयनगर, इंदूर येथून १० एप्रिलला शिंदे आणि बैरागी यांना अटक केली.


आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल नंबर आणि बँक खात्यांच्याआधारे माटुंगा पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींविरोधात एकूण ३९ तक्रारी असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार आरोपीकडे कसून चौकशी सुरू आहे. आरोपींनी उज्जैन, महानंदा नगर येथे कॉल सेंटर चालवत असल्याचे उघड होताच पोलिसांनी छापा टाकून ते उध्वस्त केले. १६ मोबाईल फोन, १५ सिम कार्ड, लॅपटॉप, राऊटर आणि ३ लाखांहून अधिक नागरीकांच्या मोबाईल क्रमांकाचा डेटा जप्त करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज