'मॅन इन द मिडल' सायबर हल्ला; गुन्हे शाखेची कारवाई - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

'मॅन इन द मिडल' सायबर हल्ला; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई, दि. १२ : युएईमधील कॅफेटेरियाचे बांधकाम साहित्य पुरवठा करणारी कंपनी असल्याचे भासवून इंटरनॅशनल शाळेची २३ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान 'मॅन इन द मिडल' सायबर अटॅक करत ८७ लाख २७ हजारांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू करून गुन्हे शाखेच्या पथकाला ८२.५५ लाख रुपये वाचवण्यात यश आले आहे.


मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलने कॅफेटेरियाचे बांधकाम साहित्य पुरवठा करण्यासाठी युएईमधील युरो फोन अकुस्टिक्स या कंपनीशी करार केला. कंपनीने त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवरून कंपनीचे युएईमधील बँक डिटेल्स व्यवहारासाठी शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र, सायबर चोराने ई-मेल आयडीसारखा दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार करून शाळेला नवीन बँक डिटेल्स पाठवले. शाळेने त्यासारखाच दिसणाऱ्या ईमेल आयडीवर विश्वास ठेवून नवीन खात्यावर ८७ लाख २६ हजार ९५५.६५ रुपये पाठवले. युएई मधील युरोफोन अकुस्टिक्स कंपनीने पुन्हा ई-मेलच्या माध्यमातून पत्र व्यवहार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेने प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात ईमेल आयडी धारकाविरोधात गुन्हा नोंदवत मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने तात्काळ पाठपुरवठा करत ८२ लाख ५७ हजार रुपये वाचवून ही रक्कम पुन्हा खात्यात जमा केली आहे.


'मॅन इन द मिडल' हल्ला हा एक प्रकारचा गुप्ता हल्ला आहे. जेथे हल्लेखोर दोघांच्या संभाषण किंवा डेटा ट्रान्सफरमध्ये व्यत्यय आणतात. हुबेहूब बनावट आयडी तयार करून फसवणूक करतात. या हल्ल्यात, मधला सहभागी दोन वैध सहभागी पैकी कोणालाही अज्ञात असलेल्या संभाषणात फेरफार करून फसवणूक करतात.


व्यवहार करताना कंपनीच्या योग्यतेबाबत शहानिशा करूनच करार करावा. कराराव्यतिरिक्त ईमेल आयडी व बँक डिटेल्स मध्ये अचानक बदल केले गेले तर संबंधित कंपनीवर व्यवहारापूर्वी खात्री करून घ्यावी. व्यवहारादरम्यान ईमेल आयडी बँक खात्याची योग्य खातर जमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज