२५ हजार डॉलर्स पळवणाऱ्या त्रिकुटाला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ९ मार्च, २०२४

२५ हजार डॉलर्स पळवणाऱ्या त्रिकुटाला अटक

मुंबई, दि. ९ : फिल्म लाईनच्या व्यवसायात असल्याची बतावणी करत फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाकडून २५००० अमेरिकन डॉलर्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष-८ ने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने माजिद उर्फ मन्नू, मयंक शर्मा उर्फ लड्डू आणि आकाश अग्रवाल उर्फ कबीर उर्फ कब्बू यांना बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार कृष्णन याचा पोलीस शोध घेत आहेत.

विलेपार्लेतील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय तक्रारदार यांचा विदेशी चलन (फॉरेन करन्सी एक्स्चेंज) बदलून देण्याचा व्यवसाय आहे. दिल्लीतील ट्रॅव्हलिंग व्यवसायिकाने त्याच्या ओळखीच्या गौरव गोस्वामी नावाच्या दिल्ली येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फॉरेन करन्सी एक्स्चेंज संदर्भात मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी गोस्वामीशी संपर्क साधला असता त्याने एका मोठ्या व्यक्तीला २५ हजार युएस डॉलरची आवश्यकता असून तो सांताक्रुज मधील हॉटेल ग्रँड ह्यातमध्ये येणार असल्याचे सांगत कृष्णन नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्यांना पाठवला.

गोस्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार हे २७ फेब्रुवारीला पत्नी सोबत यूएस डॉलर्स घेऊन कृष्णनला भेटण्यासाठी ग्रँड  हयातमध्ये गेले होते. हॉटेलमध्ये चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये कृष्णन नाव सांगणारी व्यक्ती त्यांना भेटली त्याने फिल्मलाईन व्यवसाय असल्याचे सांगत हॉटेलच्या लॉबीमध्ये अभिनेता अक्षय कुमार याची शूटिंग चालू असल्याने येथे भेटायला बोलावल्याची बतावणी केली. पुढे त्याने तक्रारदार यांना बोलण्यात गुंतवून २५००० यूएस डॉलर्स घेत तेथून तो पसार झाला.

सगळीकडे शोध घेऊन कृष्णन न सापडल्याने तक्रारदार यांनी वाकोला पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखेच्या कक्षा-८ चे प्रमुख लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान माहिती मिळताच उत्तर प्रदेश मधील रहिवाशी खान याच्यासह दिल्लीतील रहिवाशी शर्मा आणि अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून आरोपी कृष्णनचा शोध सुरू आहे.


Us-dollar cheating

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज